रायगड : राज्यातील विधानपरिषद निवडणुकांसाठी (Election) अखेर महायुतीचा फॉर्म्युला निश्चित झाला असून रायगडची जागा राष्ट्रवादीने आपल्याकडे घेण्यात यश मिळवले आहे. रायगडच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक नेते अनिकेत तटकरे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. जिल्ह्यातील सुतारवाडीत आज राष्ट्रवादी पक्षाची (NCP) बैठक पार पडली. या बैठकीला कोकणातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, नगराध्यक्ष, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते. अनिकेत तटकरे (Aniket Tatkare) यांची विधानपरिषदेची उमेदवारी महायुतीमधून निश्चित झाली असून ते अर्ज भरण्यासाठी रवाना देखील झाले आहेत. राज्याच्या मंत्री आणि बहिण आदिती तटकरे यांच्यासमवेत ते एकाच गाडीतून अर्ज भरायला गेल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे, सुनिल तटकरेंनी अखेर ही जागा लेकासाठी मिळवली, असेच म्हणता येईल.
अनिकेत तटकरे यांनी कालच शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतर, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचीही त्यांनी भेट घेतली. त्यानंतर, आज सुतारवाडीत पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेऊन ते उमेदवारी अर्ज भरण्यासाठी रत्नागिरीकडे आपल्या कार्यकर्त्यांसमवेत रवाना झाले आहेत. त्यामुळे, महायुतीमध्ये ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्याचं स्पष्ट होत असन मंत्री भरत गोगावले यांनी देखील, या जागेबाबत वरिष्ठ आज संध्याकाळपर्यंत निर्णय घेतील, असे वक्तव्य केले आहे. दरम्यान, येथील जागेसाठी शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांच्या मुलीने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे, जुईली दळवी आपला अर्ज मागे घेतात की निवडणूक लढवतात ही पुढी काही दिवसांत स्पष्ट होईल.
कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधानपरिषद जागेची निवडणूक येत्या 18 जूनला पार पडत आहे. या जागेसाठी राष्ट्रवादीकडून अनिकेत तटकरे यांचे नाव आघाडीवर असून आज रायगडच्या सुतारवाडी येथे राष्ट्रवादी कार्यकर्ते,न गरसेवक, जिल्हा परिषद सदस्य यांची बैठक पार पडली. मात्र, या बैठकीला राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि विधानपरिषदेसाठी इच्छुक असलेले उमेदवार राजीव साबळे गैरहजर राहिले, त्यांच्यासह त्यांचे समर्थक आणि माणगाव नगरपंचायतीचे नगरसेवक देखील गैरहजर राहिल्याने चर्चांना उधाण आले आहे. राजू साबळे कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेवर पुन्हा एकदा निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. मात्र, पक्षाने त्यांच्याशी कोणतीही सकारात्मक चर्चा न केल्याने ते गेल्या अनेक दिवसांपासून नाराज आहेत, त्यांची नाराजी आज पुन्हा दिसून आली.