जीम बॉडी बनवणारे 150 'टर्मिन' इंजेक्शन्स जप्त; बुलेटसह दोन आरोपीही ताब्यात, पोलिसांकडून तरुणाईला आवाहन
सुनील दिवाण, एबीपी माझा May 31, 2026 05:43 PM

सोलापूर : सध्या तरुणाईमध्ये जीम (gym) बॉडी बनवून आपले देहप्रदर्शन करणे किंवा आपल्या प्रतिमा निर्माण करण्याचा नवा ट्रेंड पाहायला मिळत आहे. त्यातूनच, अनेक तरुण जीममध्ये जाऊन घामही गाळतात आणि प्रोटीन किंवा इंजेक्शनचे डोस घेऊन शरीरयष्टी पिळदार करण्यासाठी धडपड करतात. मात्र, काहीवेळा अतिरिक्त प्रोटीन किंवा इजेक्शनचा डोस तरुणांच्या जीवावर बेतू शकतो. कारण, हे इंजेक्शन डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेतल्यास घातकही ठरू शकतात. जिल्ह्यातील (Solapur) करमाळा पोलिसांनी (Police) अशीच एक कारवाई केली असून दोन आरोपींसह जीम बॉडीसाठी देण्यात येणारी टर्मिन इंजेक्शन जप्त केली आहेत. ​दुचाकीसह एकूण 2 लाख 9 हजार रुपयांच्या मुद्देमालासह दोघांना अटक करण्यात आली आहे. 

आपली ​शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी आणि तात्पुरती चांगली शरीरयष्टी बनवण्यासाठी जिममध्ये जाणाऱ्या तरुणांना आकर्षित करणाऱ्या टर्मिन इंजेक्शन्सची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या दोन इसमांना करमाळा पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईत 'मेफेनटरमाइन सल्फेट या घातक इंजेक्शन्सच्या एकूण 150 बाटल्या आणि गुन्ह्यात वापरलेली बुलेट मोटारसायकल असा एकूण 2 लाख 9 हजार 133 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.​ अन्न व औषध प्रशासनाच्या नियमान्वये हे सर्व इंजेक्शन्स डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय विकण्यास कायद्याने बंदी असूनही, आरोपी कोणत्याही खरेदी बिलाशिवाय आणि परवान्याशिवाय त्याची विक्री करत होते. याप्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ४८८/२०२६ भा.न्या.सं. कलम २७८, १२५, १२३, ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, जीममध्ये घाम गाळल्यानंतर कुठल्याही इंजेक्शन किंवा प्रोटीनच्या आहारी न जाता तरुणांनी नैसर्गिक आहारावर भर दिला पाहिजे, असे आवाहन ​करमाळा पोलिसांच्यावतीने पोलीस निरीक्षक रणजित माने यांच्याकडून करण्यात आले आहे. 

पंढरपुरात जुगाऱ्यांना दणका, 13 लाखांचा मुद्देमाल जप्त

पंढरपूरचे सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांनी आता पंढरपुरातील जुगाऱ्यांना दणका दिला असून खर्डी या गावात एका शेतात छापा टाकत 13 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. खर्डी येथे झाडाखाली आठ लोक जुगार खेळताना दिसून आले. यावेळी पोलिसांनी थेट कारवाई करत आठ लोकांकडे असणारे पैसे वाहन असा तब्बल 13 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. पंढरपुरात सध्या सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या पथकाच्या माध्यमातून अवैध वाळू, अवैध दारू आणि रोड रोमिओन विरोधात जोरदार कारवाई सुरू असताना आता जुगाऱ्यांना देखील दणका दिला आहे

मोठी बातमी! अनिकेत तटकरेंची उमेदवारी फिक्स, फॉर्म भरायला रवाना; बहिण-भाऊ एकाच गाडीत, सुनेत्रा पवारांचीही भेट

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.