Big Director Supports Ranveer Singh on FWICE Ban: सध्या बॉलिवूडमध्ये (Bollywood News) 'डॉन 3' प्रकरणावरून चांगलाच वाद निर्माण झाला आहे. सिनेमाचं शुटिंग सुरू होण्याच्या तोंडावर मुख्य भूमिकेत झळकणाऱ्या रणवीर सिंहनं (Ranveer Singh) सिनेमातून माघार घेतली. त्यामुळे दिग्दर्शक फरहान अख्तर (Farhan Akhtar) आणि रणवीर सिंह (Actor Ranveer Singh) यांच्यात वाद उफाळला. रणवीरनं तडकाफडकी सिनेमातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानं निर्मात्यांचं मोठं आर्थिक नुकसान झाल्याचा दावा केला गेला. रणवीरनं नुकसान भरपाई देण्यासही नकार दिला. याच पार्श्वभूमीवर FWICE कडून त्याच्यावर कारवाई करत त्याला कोणीही त्यांच्या चित्रपटात घेऊ नये असं म्हणत बॅन केलं. रणवीर वर झालेल्या कारवाईवर त्याने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नसून चित्रपटसृष्टीतील एका बड्या दिग्दर्शकानं रणवीर सिंहला नाही तर FWICEलाच बॅन करायला हवं असं म्हणत रणवीरला पाठिंबा दिलाय.
दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी अभिनेता रणवीर सिंहवर लावण्यात आलेल्या FWICE च्या बंदीवर जोरदार टीका केली आहे. बॉलिवूड स्टार्समुळे लाखो सिने कामगारांना रोजगार मिळतो, उद्योग संघटनांमुळे नाही, असे म्हणत त्यांनी FWICEला फटकारले.
FWICE ने सोमवारी रणवीर सिंहविरोधात असहकाराचा आदेश जारी केला होता. फरहान अख्तरच्या ‘डॉन 3’ या चित्रपटातून बाहेर पडल्यामुळे ही कारवाई करण्यात आली.
राम गोपाल वर्मा यांनी शनिवारी त्यांच्या X हँडलवर पोस्ट शेअर करत रणवीरची बाजू घेतली. “FWICE वर बंदी घाला, रणवीर सिंहवर नाही. ही तथाकथित बंदी अखेरीस FWICE साठीच मोठा विनोद ठरेल. ते कामगारांचे किंवा इंडस्ट्रीचे संरक्षण करत असल्याचा दावा करत असले, तरी हा फक्त जुनाट युनियन सिस्टीमच्या शक्तीप्रदर्शनाचा प्रयत्न आहे,” असे त्यांनी लिहिले.
ते पुढे म्हणाले, “FWICE हे ना न्यायालय आहे ना सरकारमान्य नियामक संस्था. उलट ती एका ‘कांगारू कोर्ट’सारखी वागत आहे, जी न्याय देण्याचा दिखावा करते पण कायदेशीर प्रक्रिया आणि निष्पक्षतेकडे दुर्लक्ष करते. रणवीरसारखे स्टार्सच लाखो कामगारांना रोजगार देतात. रणवीरसारखे कलाकार नसते, तर इंडस्ट्री आणि FWICE दोन्ही अस्तित्वातच नसते.” FWICE ने अद्याप राम गोपाल वर्मा यांच्या या पोस्टवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
दरम्यान, फरहान अख्तर आणि त्यांचे भागीदार रितेश सिधवानी यांनी रणवीर सिंहविरोधात इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशनकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर हे प्रकरण FWICE कडे पाठवण्यात आले. ‘डॉन 3’ या चित्रपटाचे शूटिंग अद्याप सुरूही झाले नव्हते. मात्र निर्मात्यांच्या म्हणण्यानुसार, प्री-प्रोडक्शनवर 45 कोटी रुपयांहून अधिक खर्च झाला होता.
FWICE च्या माहितीनुसार, रणवीर सिंहला अनेक नोटिसा पाठवण्यात आल्या, पण त्याने कोणतेही उत्तर दिले नाही.‘डॉन 2’ नंतर फरहान अख्तर दिग्दर्शनात पुनरागमन करणार होते. 1978 मध्ये प्रदर्शित झालेल्या मूळ ‘डॉन’ चित्रपटात अमिताभ बच्चन आणि झीनत अमान मुख्य भूमिकेत होते. तर ‘डॉन 2’ मध्ये शाहरुख खान झळकला होता. मिळालेल्या माहितीनुसार, स्क्रिप्टमधील बदलांमुळे रणवीर सिंहने ‘डॉन 3’ मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. निर्मात्यांचा आरोप आहे की, ‘धुरंधर’ या चित्रपटाच्या यशानंतर रणवीरने ‘डॉन 3’ वारंवार पुढे ढकलला आणि अखेर डिसेंबर 2025मध्ये चित्रपट सोडला.