फुटबॉलचा सामना संपला अन् दगडफेक अन् रस्त्यांवर जाळपोळ! हाय अलर्ट असतानाही पॅरिस कसं पेटवलं? 700 हून अधिक जणांना अटक
किरण महानवर May 31, 2026 11:43 PM

हंगेरीच्या बुडापेस्ट येथे झालेल्या अटीतटीच्या सामन्यात पॅरिस सेंट जर्मेन संघाने आर्सेनलवर मात केली. सामना संपल्याची अंतिम शिट्टी वाजताच फ्रान्समध्ये एकच जल्लोष सुरू झाला. हा ऐतिहासिक विजय साजरा करण्यासाठी जवळपास 20 हजार चाहते पॅरिसमधील प्रसिद्ध 'चॅम्प्स-एलिसीज' (Champs-Élysées) परिसरात एकत्र आले होते. सुरुवातीला रस्त्यांवरून रॅली काढण्यात आल्या, फटाके फोडले गेले आणि गाड्यांच्या हॉर्ननी संपूर्ण परिसर दणाणून सोडला.

परंतु, काही वेळातच या जल्लोषाला गालबोट लागले. गर्दीत सामील झालेल्या काही समाजकंटकांनी हुल्लडबाजी करण्यास सुरुवात केली. त्यांनी रस्त्या कडेला असलेल्या दुकानांची तोडफोड केली, गाड्यांची जाळपोळ केली आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले. यामुळे पॅरिसमधील मुख्य रिंग रोड काही काळासाठी पूर्णपणे ठप्प झाला होता.

परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पॅरिस पोलिसांनी कडक पावले उचलली. दंगल नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने 22 हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला. हुल्लडबाजांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमारचा वापर केला. या दरम्यान संतप्त जमावाने पोलिसांवर जोरदार दगडफेक आणि गोळीबार केला. समाजकंटकांच्या या हल्ल्यात 7 पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. शनिवारी मध्यरात्रीपासून ते रविवारी पहाटेपर्यंत हा हायड्रॉमा सुरू होता. अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

विशेष म्हणजे, पॅरिसमध्ये अशा प्रकारची हिंसाचार घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षी मे महिन्यात जेव्हा पीएसजीने पहिल्यांदा चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद पटकावले होते, तेव्हाही अशीच भीषण दंगल झाली होती. त्या वेळीही 700 हून अधिक जणांना अटक करण्यात आली होती. गेल्या वर्षीचा अनुभव लक्षात घेऊन पॅरिस प्रशासन आधीच हाय अलर्टवर होते. शहरात मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त ठेवण्यात आला होता, तरीही समाजकंटकांनी पुन्हा एकदा शांतता भंग केली. पोलिसांनी सध्या संपूर्ण परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला असून, सीसीटीव्हीच्या आधारे इतर फरार आरोपींचा शोध घेतला जात आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.