आयपीएल 2026 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे संघ आमनेसामने आहेत. या सामन्यात गुजरात टायटन्सने नाणेफेकीचा कौल गमावला आणि प्रथम फलंदाजी करावी लागली. शुबमन गिल आणि साई सुदर्शन आश्वासक सुरूवात करतील अशी अपेक्षा होती. पण त्यांनी क्रीडाप्रेमींचा अपेक्षाभंग केला. दोघंही स्वस्तात बाद झाले. इतकंच काय तर निशांत सिंधूही 20 धावा करून बाद झाला. त्यामुळे गुजरात संघ अडचणी आला. अशा स्थितीत गुजरात टायटन्स संघाची जोस बटलर आणि वॉशिंग्टन सुंदरच्या खांद्यावर होती. असं असताना दहाव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर वॉशिंग्टन सुंदरने उत्तुंग फटका मारला आणि झेल बाद झाल्याने मैदान सोडून तंबूच्या दिशेने जातहोता. पण त्याला पंचांनी थांबवलं आणि झेल योग्य पद्धतीने घेतला की याची तपासणी केली. तेव्हा झेल बाद नसल्याचं तिसऱ्या पंचांनी जाहीर केलं आणि वॉशिंग्टन सुंदरला जीवदान मिळालं.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून संघाचं दहावं षटक टाकण्यासाठी जेकब डफी आला होता. या षटकात एकूण चार धावा आल्या म्हणून शेवटच्या चेंडूवर वॉशिंग्टन सुंदरने संधी घेण्याचा प्रयत्न केला. लेग स्टंपवर आखुड टप्प्याचा चेंडू टाकल्याने त्याने त्याचा लाभ घेतला. पण टायमिंग चुकल्याने फाइन लेगला झेल गेला. पण हा झेल आयोग्य असल्याचं तिसऱ्या पंचांच्या लक्षात आलं. रिप्लेमध्ये स्पष्टपणे दिसून आलं की झेलवर कॉक्सचे नियंत्रण नव्हते. चेंडू त्याच्या दोन्ही हातांच्या अनामिकांमध्ये अडकला होता आणि पकडल्यानंतरही त्याच स्थितीत होता. चेंडू गवताला स्पर्श घासल्याचं स्पष्ट दिसलं आणि पंचांना नाबाद घोषित केला.
पंचांच्या या निर्णयानंतर आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारला वैतागलेला दिसला. त्याला नाबाद का दिलं याबाबत त्याने पंचांना विचारणा केली. पण पंचांनी असा निकाल देण्याचं कारण स्पष्ट केलं आणि पाटीदार बाजूला झाला. त्यामुळे अवघ्या 4 धावांवर असलेल्या वॉशिंग्टन सुंदरला आणखी एक संधी मिळाली.