इराणमध्ये मोठा भूकंप ? अमेरिकेशी संबंध ताणलेले असतानाच राष्ट्रपती पेजेशकियान यांनी उचललं मोठं पाऊल
GH News June 01, 2026 01:11 PM

मध्य पूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर, इराण आणि अमेरिका यांच्यात शांतता कराराबाबत गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. मात्र कोणताही ठोस निर्णय झालेला नसल्यामुळे अद्यापही युद्धाबाबत अनिश्चितता आहे. असं असतानाच आता, इराणमधील अंतर्गत तणावही कायम आहे. इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी सर्वोच्च नेत्यांच्या कार्यालयात आपला राजीनामा सादर केला आहे, असा दावा इराणी माध्यमांच्या एका वृत्ताचा हवाला देत फॉक्स न्यूजने केला. मात्र राजीनाम्याचा हा दावा निराधार असल्याचे सांगत राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयाने हे वृत्त फेटाळून लावलं आहे. मात्र या कथिच वृत्यामुळे इराणमध्ये चांगलीच खळबळ माजली आहे.

इराण इंटरनॅशनलमधील एका अज्ञात सूत्राचा हवाला देणाऱ्या अहवालानुसार, पेझेश्कियान यांनी आपल्या पत्रात असं म्हटलंय की, त्यांच्या प्रशासनाला इराणमधील महत्त्वाच्या निर्णयप्रक्रियांपासून दूर ठेवण्यात आलं आहे. तर इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) मधील कट्टरपंथी गटांनी महत्त्वाच्या बाबींवरील नियंत्रण आपल्या हाती घेतलं आहे.

तात्काळ प्रभावाने राजीनामा देण्याच्या विनंतीचा दावा

पेझेश्कियान यांनी लिहिलं की, अशा परिस्थितीत ते प्रभावीपणे शासन करण्यास किंवा आपल्या कायदेशीर जबाबदाऱ्या पार पाडण्यास असमर्थ आहेत आणि त्यामुळे त्यांनी राष्ट्रपतीपदाचा तात्काळ राजीनामा स्वीकारण्याची विनंती केली आहे. असाही या दावा वृत्तपत्राच्या अहवालात करण्यात आला आहे. मात्र सर्वोच्च नेते मुज्तबा खामेनेई यांच्या कार्यालयाकडून हा राजीनामा स्वीकारला जाईल की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही, असंही इराण इंटरनॅशनलने म्हटलं आहे.

निराधार चर्चांकडे लक्ष देऊ नका 

मात्र, इराणच्या राष्ट्रपती कार्यालयातील एका अधिकाऱ्याने या राजीनाम्याचे वृत्त फेटाळून लावले. “प्रसिद्धीच्या हव्यासापोटी एका तरुणाने राष्ट्रपतींच्या भूमिकांबद्दल केलेलं निराधार आणि वादग्रस्त विधानं गांभीर्याने घेऊ नये” असं राष्ट्रपती कार्यालयातील संचार आणि माहिती प्रसार विभागाचे उपप्रमुख सय्यद मेहदी तबातबाई म्हणाले. दिशाभूल झालेल्या काही घटकांच्या बालिश वागण्यामुळे, तरुणांमध्ये देश चालवण्याची क्षमता नाही असा खोटा समज निर्माण होऊ नये. इराण हा हुशार तरुणांनी भरलेला देश आहे, ज्यांना उत्तम व्यवस्थापक बनण्याची संधी मिळालेली नाही, असंही त्यांनी पुढे नमूद केलं.

राष्ट्रपतींच्या राजीनाम्याचं वृत्त फेटाळून लावत ते पुढे म्हणाले,  “एका बदनाम परदेशी नेटवर्कने पसरवलेल्या अफवा म्हणजे “मीडिया गेम” आहे”.  ” वास्तव काय आहे, खरी परिस्थिती काय हे सांगण्याऐवजी त्यांनी स्वतःच्या मनाने रचून गोष्टी सांगितल्या आहेत. इराणचे अध्यक्ष पेझेश्कियान जनतेची सेवा करण्यापासून मागे हटणार नाहीत, तसेच इराणी जनताही एकता आणि प्रतिकाराच्या मार्गावरून मागे हटणार नाही”, असा दावा क्यांनी केला.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.