परदेशात फिरायला जाण्याचे स्वप्न अनेक भारतीय पाहतात. नवीन देश, संस्कृती आणि अनुभव यांचा आनंद घेण्यासाठी दरवर्षी लाखो भारतीय जगभर प्रवास करतात. मात्र सध्या सोशल मीडियावर एका वेगळ्याच कारणामुळे भारतीय पर्यटक चर्चेत आले आहेत.
उद्योगपती हर्ष गोयनका यांनी शेअर केलेल्या एका पोस्टमुळे ‘सिव्हिक सेन्स’ म्हणजेच नागरिक शिष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. स्वित्झर्लंडमधील एका हॉटेलमध्ये भारतीय पाहुण्यांसाठी खास नियमावली लावण्यात आल्याचा दावा करण्यात आला असून त्यातील काही सूचना वाचून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
हर्ष गोयनका यांची पोस्ट व्हायरल
यांनी सोशल मीडियावर एका हॉटेलमधील नियमांचा फोटो शेअर करत आपला अनुभव मांडला. त्यांच्या मते, स्वित्झर्लंडमधील एका हॉटेलमध्ये भारतीय पर्यटकांसाठी विशेष सूचना देण्यात आल्या होत्या. या पोस्टमध्ये त्यांनी काही प्रसंगांचाही उल्लेख केला. रेस्टॉरंटमध्ये अचानक गरबा खेळणे, विमानतळांवर मोठ्याने बोलणे किंवा विमानातील जागेला पिकनिक स्पॉटसारखे वापरण्याच्या घटना सोशल मीडियावर वारंवार व्हायरल होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
त्यांनी दावोसमधील एका प्रसंगाचाही उल्लेख केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, एका भारतीय व्यावसायिकाने क्लबमध्ये इतक्या मोठ्या आवाजात संगीत लावले होते की त्याची चर्चा संपूर्ण परिसरात झाली होती.
नेमके काय आहेत हे नियम
हे नियम स्वित्झर्लंडमधील Arc-en-Ciel Hotel या हॉटेलशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. या नियमांमध्ये जेवण, शांतता आणि इतर पाहुण्यांचा आदर याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
जेवणासंबंधी सूचना:
– बुफेमधील अन्न बाहेर नेऊ नये.
– सर्व पाहुण्यांना अन्न मिळावे यासाठी दिलेली कटलरीच वापरावी.
– अतिरिक्त व्यक्तीने डिश शेअर केल्यास सेवा शुल्क आकारले जाऊ शकते.
– लंच पॅक हवा असल्यास स्वतंत्र ऑर्डर द्यावी लागेल.
वर्तनासंबंधी सूचना
– कॉरिडॉरमध्ये शांतता राखावी.
– बाल्कनीत किंवा सार्वजनिक ठिकाणी मोठ्याने बोलणे टाळावे.
– इतर पाहुण्यांच्या विश्रांतीचा आदर करावा.
– रात्रीच्या वेळेत अनावश्यक आवाज करू नये.
नियमांपेक्षा चर्चेत आला ‘सिव्हिक सेन्स’
या पोस्टनंतर सोशल मीडियावर दोन गट पडल्याचे दिसून आले. काही जणांनी अशा नियमांची गरज असल्याचे सांगितले. परदेशात गेल्यानंतर स्थानिक संस्कृती, शिस्त आणि सार्वजनिक नियमांचे पालन करणे प्रत्येक पर्यटकाचे कर्तव्य असल्याचे त्यांचे मत होते. तर काहींनी या नियमांना भारतीयांना लक्ष्य करणारे आणि अन्यायकारक ठरवले. काही लोकांच्या वागण्यामुळे संपूर्ण देशाची प्रतिमा तयार करणे योग्य नसल्याचेही अनेकांनी नमूद केले.
पर्यटनासोबत जबाबदारीही महत्त्वाची
परदेशात प्रवास करताना आपण केवळ स्वतःचे प्रतिनिधित्व करत नाही, तर आपल्या देशाची प्रतिमाही जगासमोर मांडत असतो. त्यामुळे स्थानिक नियम, संस्कृती आणि सामाजिक शिष्टाचार यांचा आदर करणे महत्त्वाचे मानले जाते.