मोठी बातमी: टीआरपी नसल्याने स्टार प्रवाह ''मी सावित्रीबाई...' मालिका बंद करणार, अमोल कोल्हेंनी चॅनेलला फटकारलं, म्हणाले...
abp majha web team June 01, 2026 05:43 PM

Me Savitribai Jyotirao Phule serial off Air: टीआरपीच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी स्टार प्रवाहने (Star Pravah) अलीकडेच नव्या कोऱ्या 8 मालिकांची घोषणा केली आहे. नव्या मालिकांच्या सपाट्यात मात्र, डॉ अमोल कोल्हे (Amol Kolhe) आणि अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर (Madhurani Prabhulkar) यांच्या प्रमुख भूमिका असलेली 'मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ' (Mi Savitribai Jyotirao Phule) ही मालिका  आता अवघ्या 152 भागांमध्येच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ही मालिका सुरू होऊन पाचच महिने झाले होते. 14 जूनला ही मालिका बंद होईल असं अभिनेते डॉ अमोल कोल्हे यांनी सांगितलं. 'मालिका अवघ्या 152 भागांमध्ये संपते हे दुर्दैव आहे.पण, मालिकेची गोष्ट थांबणार नाही. एका वेगळ्या मंचावर ही गोष्ट प्रेक्षकांना पाहायला मिळेल' असं त्यांनी 'मुंबई टाइम्स'ला बोलताना म्हटलं. 

गेल्या काही दिवसांपासून 'मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले' मालिका संपण्याविषयीच्या चर्चा सुरू होत्या. अखेर 152 भागांमध्ये ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेच्या जागी 'सुना येती घरा' ही मालिका सुरू होणार आहे. 

Amol Kolhe: अमोल कोल्हे काय म्हणाले ?

'मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले' मालिका अवघ्या पाच महिन्यात ऑफ एअर झाल्याने प्रेक्षकांना मोठा धक्का बसला आहे.  येत्या तीन महिन्यांमध्ये स्टार प्रवाह वाहिनी नव्या आठ मालिका आणणार आहे. त्यामुळे अवघ्या 152 भागांमध्येच अमोल कोल्हे आणि मधुराणी प्रभुलकर यांची प्रमुख भूमिका असणारी ' मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ' मालिका गुंडाळण्यात आली.  यावर अभिनेते डॉ अमोल कोल्हे म्हणाले 'शिक्षण हेच खरं सामर्थ्य 'हा विचार रुजवण्यासाठी सावित्रीबाई फुले आणि ज्योतीराव फुले यांनी बराच संघर्ष केला . 'मी सावित्रीबाई जोतिराव फुले ' या मालिकेतून प्रेक्षकांनी या मालिकेतील त्यांचा प्रवास पाहिला आहे.मात्र खऱ्या अर्थाने जिथे त्यांची गोष्ट सुरू होते त्याच टप्प्यावर मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ही मालिका संपणार असली तरी ही गोष्ट वेगळ्या व्यासपीठावर नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येईल .एकीकडे आपण महात्मा फुले यांचा जन्मशताब्दी वर्ष साजरा करतोय. पण 152 भागांमध्येच मालिका संपते हे दुर्दैव आहे. मात्र, गोष्ट थांबणार नाही. लवकरच एका वेगळ्या मंचावर प्रेक्षकांना ही गोष्ट पाहायला मिळेल. ''असे अमोल कोल्हे म्हणाले.

"या मालिकेसाठी सतीश राजवाडे, कौस्तुभ बेडेकर, अभिजीत खाडे यांनी खूप सहकार्य केलं.पण त्यांच्याही वर असणाऱ्यांची विचार प्रणाली नेमकी काय आहे, हे सांगता येत नाही ' असंही त्यांनी स्पष्ट केलं. ते पुढे म्हणाले ' ज्या मालिकांना टीआरपीच्या मोजपट्टीत बसवलं जातं, त्याच्या अरकाईव्ह व्हॅल्यूचा विचारही केला पाहिजे. 'राजा शिवछत्रपती' ही मालिका आज वेगळ्या वाहिनीवर दाखवली जाते आहे. यासह 'स्वराज्य रक्षक संभाजी' ही मालिकाही अनेक भाषांमध्ये डब झाली. आणखी एक गोष्ट म्हणजे अनेक लोक दैनंदिन मालिका ..वाहिनीच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहतात.पण टीआरपी फक्त सायंकाळी प्रसारित होणाऱ्या भागांचा मोजला जातो.त्यामुळे टीआरपीचं कारण हे माझ्या मते अर्धसत्य आहे. असंही ते म्हणाले.

 

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.