नवी दिल्ली : प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला ऑईल मार्केटिंग कंपन्यांकडून एलपीजीचे दर जाहीर केले जातात. 1 जूनला एलपीजी सिलेंडरचे दर जाहीर करण्यात आले आहेत. एलपीजी सिलेंडरच्या दरात वाढ करताना यावेळी देखील घरगुती वापराच्या सिलेंडरच्या दरात वाढ करण्यात आलेली नाही. दुसरीकडे 19 किलोच्या व्यावसायिक वापराच्या एलपीजी सिलेंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. आज 19 किलोच्या सिलेंडरचे दर 42 रुपयांनी महागले आहेत. गेल्या पाच महिन्यात 19 किलोच्या सिलेंडरचे दर दुप्पट झाले आहेत.
आज ऑईल मार्केटिंग कंपन्यांकडून जानेवारीपासून सातव्यांदा वाढ करण्यात आली आहे. 19 किलोच्या सिलेंडरचे दर 42 रुपयांनी महागले आहेत. वेगवेगळ्या राज्यातील वाढ वेगळी आहे. आज 19 किलोच्या सिलेंडरचे दर 42 ते 53.50 रुपयांपर्यंत वाढले आहेत.
1 जानेवारीपूर्वी 19 किलोच्या सिलेंडरचा दर 1580 रुपये होता. 1 जूनला तोच दर आता 3113.50 रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच 19 किलोच्या एलपीजीच्या दरात दुप्पट वाढ झाली आहे. 19 किलोच्या एलपीजी सिलेंडरच्या दरात जानेवारी महिन्यात 111 रुपये, फेब्रुवारीत 49 रुपये, मार्चमध्ये 28 रुपये, 7 मार्चला 114.50 रुपये, एप्रिल महिन्यात 195.50 रुपये, मे महिन्यात 993 रुपये आणि जून महिन्यात 42 रुपयांची वाढ झाली आहे.
घरगुती वापराच्या 14 किलोच्या सिलेंडरच्या दरात 7 मार्चला बदल करण्यात आला होता. त्यानंतर त्यामध्ये बदल करण्यात आलेला नाही. दिल्लीत घरगुती गॅस सिलेंडरचा दर 913 रुपये, कोलकाता येथे 939 रुपये आणि मुंबईत 912.50 रुपये इतका आहे.
छोटे व्यावसायिक आणि नागरिकांद्वारे वापरल्या जाणाऱ्या 5 किलोच्या सिलेंडरचा दर 821.50 रुपये झाला आहे. आज या सिलेंडरच्या दरात 11 रुपयांची वाढ झाली आहे.
आखाती देशात अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धाचा परिणाम जागतिक ऊर्जा साधनांच्या पुरवठ्यावर होत आहे. सुरुवातीला इराणकडून होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्यात आली होती. त्यानंतर अमेरिकेनं होर्मुझच्या सामुद्रधुनीत नाकेबंदी करण्यात आली होती. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून 20 टक्के तेलवाहतूक केली जाते. या वाहतुकीवर परिणाम झाल्यानं तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला. पुरवठ्यावर परिणाम झाल्यानं इंधनाचे दर वाढत आहेत. भारतात जवळपास 40 टक्के क्रूड ऑईल, 65 टक्के नैसर्गिक गॅस आणि 90 टक्के एलपीजी आखाती देशांमधून येतो. आखाती देशातील स्थिती पूर्ववत न झाल्यानं दरवाढ होत आहे. याशिवाय भारतात प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला एलपीजीचे दर नव्यानं जाहीर केले जातात. ते दर आंतरराष्ट्रीय बाजारातील क्रूड ऑईल, डॉलर-रुपया विनिमय दर, वाहतूक खर्च आणि सरकारी धोरणांच्या प्रभावानं ठरतो.
आणखी वाचा