सुप्रिया सुळेंच्या 'त्या' गंभीर आरोपावर पुणे पोलीस आयुक्तांचे 9 पानांचे उत्तर; थेट आकडेवारी जाहीर करत गुन्हेगारीत घट झाल्याचा दावा
शिवानी पांढरे June 02, 2026 01:13 PM

Amitesh Kumar on Supriya Sule: पुणे (Pune) शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या (Crime) मुद्द्यावरून राजकीय नेते आणि पोलीस प्रशासन आमनेसामने आले आहे. "पुणे शहर गुन्हेगारांची राजधानी होत आहे," असा गंभीर आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी पुणे पोलीस आयुक्त (Pune Police Commissioner) अमितेश कुमार (Amitesh Kumar) यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याची मागणी केली होती. सुळेंच्या या टीकेला आणि आरोपांना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी थेट 9 पानांचे पत्र लिहून सडेतोड उत्तर दिले आहे. पत्रात त्यांनी शहरातील गुन्हेगारीचा आलेख सातत्याने घसरत असल्याचा दावा करत अधिकृत आकडेवारीच सुप्रिया सुळे यांच्यासमोर मांडली आहे.

Amitesh Kumar on Supriya Sule: विषारी दारू प्रकरणानंतर सुळेंचा हल्लाबोल; आयुक्तांचे प्रत्युत्तर

पुण्यात विषारी दारू प्रकरणामुळे 21 जणांचा मृत्यू झाल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन पोलीस प्रशासनावर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले होते. या टीकेला उत्तर देताना आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रात म्हटले आहे की, "आम्ही विधायक टीकेचे नेहमीच स्वागत करतो. मात्र, सोशल मीडियावरील चुकीच्या आकडेवारीमुळे नागरिकांमध्ये अविश्वासाचे वातावरण निर्माण होते, ज्याचा गैरफायदा असामाजिक तत्व घेतात. यामुळे शहराची बदनामी होते आणि पोलीस दलाचे मनोधैर्य खच्ची होते," असे त्यांनी म्हटले आहे. तर पुण्याची 'आयटी आणि एज्युकेशन हब' ही ओळख सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वांनी पोलीस दलाला मार्गदर्शन आणि समर्थन करावे, अशी विनंतीही आयुक्तांनी पत्रात केली आहे.

Amitesh Kumar on Supriya Sule: पोलीस आयुक्तांनी पत्रात दिलेली गुन्ह्यांची आकडेवारी (1 जानेवारी ते 27 मे 2026) 

अमितेश कुमार यांनी पत्राद्वारे पुणे शहरात गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झाल्याचा दावा केला आहे.

सोनसाखळी चोरी (Chain Snatching) : 56 टक्के घट

लुटमार/जबरी चोरी (Robbery) : 36 टक्के घट

वाहन चोरी (Vehicle Theft) : 28 टक्के घट

खुनाचा प्रयत्न : 27 टक्के घट

घरफोडी (Housebreaking) : 14 टक्के घट

वाहनांची तोडफोड (Vehicle Vandalism) : 50 टक्क्यांपेक्षा जास्त घट 

खुनाचे गुन्हे : 10.5 टक्के घट (वाढलेल्या 6 पैकी 10 गुन्हे अंतर्गत कौटुंबिक वादातून)

Amitesh Kumar on Supriya Sule: देशातील 19 महानगरांच्या यादीत पुणे १८ व्या क्रमांकावर!

नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो (NCRB) च्या रॅकिंगचा हवाला देत आयुक्तांनी सांगितले की, देशातील 19 प्रमुख महानगरांच्या यादीत दखलपात्र गुन्ह्यांच्या प्रमाणात पुणे 18 व्या क्रमांकावर असून, ते देशातील एक अत्यंत सुरक्षित शहर (Safe City) आहे. मागील दोन वर्षांत 2 आवश्यक पावले उचलण्यात आली आहेत. 

मकोका (MCOCA) कारवाई: 200 गुन्ह्यांत 1,000 हून अधिक गुन्हेगारांवर कारवाई.

एमपीडीए (MPDA): 250 जणांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई तर 500 गुन्हेगार तडीपार.

ड्रग्ज माफियांच्या मुसक्या आवळल्या: मागील दोन वर्षांत 20 कोटींचे ड्रग्ज जप्त; तर 2024 मध्ये 3,700 कोटींचे आंतरराष्ट्रीय रॅकेटउद्ध्वस्त केले.

Amitesh Kumar on Supriya Sule: केवळ मे महिन्यात परिस्थिती बदलली; 'लॉकडाऊन'च्या अफवांवर स्पष्टीकरण

पत्रात मान्य करण्यात आले आहे की, केवळ मे 2026 मध्ये अवघ्या 10 दिवसांच्या कालावधीत 5 गंभीर घटना घडल्या. त्यामुळे गुन्हेगारी वाढल्याचे चित्र निर्माण झाले, मात्र पोलिसांनी तातडीने गस्त वाढवली आहे. तसेच, आगामी बकरी ईदच्या (Bakri Eid) पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेली अधिसूचना म्हणजे शहरात 'लॉकडाऊन' (Lockdown) नव्हे, ती केवळ एक अफवा (Rumor) असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. रात्री 10 नंतर केवळ तात्पुरत्या टपऱ्या आणि फेरीवाले बंद करण्यात येत असून, अधिकृत परवानाधारक दुकानांवर कोणतेही निर्बंध नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, पोलीस आयुक्तांच्या या आकडेवारीसह दिलेल्या उत्तरानंतर आता खासदार सुप्रिया सुळे यावर काय प्रतिक्रिया देतात? याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

Arun Lakhani and Supriya Sule: भाजपकडून उमेदवारी मिळालेले सुप्रिया सुळेंचे व्याही अरुण लखाणींचा राजकारणाबाबत अमूल्य सल्ला, म्हणाले...

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.