प्राथमिक शिक्षण मंडळातील अधिकाऱ्याला 25 हजारांची लाच घेणं भोवलं; कोल्हापूर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडलं
विजय केसरकर, एबीपी माझा June 02, 2026 01:13 PM

Kolhapur Crime News : कोल्हापूर महानगरपालिका शाळेतील शिक्षकाचा तीन महिन्याचा पगार फरक काढण्यासाठी 25 हजार रुपयांची लाच स्वीकारताना प्राथमिक शिक्षण मंडळाकडील प्रभारी प्रशासन अधिकारी डी.सी. कुंभार याला लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडलेय. छत्रपती शिवाजी मार्केट इथल्या प्राथमिक शिक्षण मंडळ कार्यालयात करण्यात आलेल्या या कारवाईमुळे सर्वत्र एकच खळबळ उडालीय. सोमवारी (1 जून) सायंकाळच्या सुमारास हि कारवाई करण्यात आली असून या या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहे. (Kolhapur Crime News)

Kolhapur Crime News : नेमकं प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी जिल्ह्यातील एक प्राथमिक शिक्षक आंतर जिल्हा बदली होऊन चार महिन्यापूर्वी कोल्हापूर महापालिकेच्या प्राथमिक शाळेत सेवेत रुजू झालेत. संबधित तक्रारदार शिक्षकाकडे कोल्हापूर महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण मंडळाकडील प्रभारी प्रशासन अधिकारी डी.सी.कुंभार यांनी ना हरकत दाखला देण्यासाठी दहा हजार रुपयांची मागणी केली होती. त्यानुसार संबंधित तक्रार शिक्षकांने कुंभार यांना दहा हजार रुपये यापूर्वी दिले होते.

शिक्षकाकडे 40 हजार रुपये लाचेची मागणी, तडजोडीअंती 25 हजार रुपये देण्याचे ठरलं, पण...

मात्र तक्रारदार शिक्षकाचा तीन महिन्याचा पगार अद्याप मिळाला नसल्याने तीन महिन्यांचा थकीत पगार आणि फरक मिळण्यासाठी संबंधित शिक्षकांना प्राथमिक शिक्षण मंडळाकडे अर्ज केला होता. मात्र प्रभारी प्रशासन अधिकारी डी.सी.कुंभार यांनी संबंधित शिक्षकाकडे 40 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती 25 हजार रुपये देण्याचे ठरले होते. त्यानुसार पगार आणि फरक काढण्यासाठी शिक्षकाकडून 25 हजारांची लाच स्वीकारताना प्रभारी प्रशासन अधिकारी डी.सी. कुंभार याला लाच लचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडलय.

Borivali RTO : बोरिवली आरटीओ कार्यालयातील वरिष्ठ लिपिक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात

बोरिवली येथील प्रादेशिक परिवहन विभाग (RTO) कार्यालयातील वरिष्ठ लिपिकाला ४ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या बसवर प्रादेशिक परिवहन विभाग, बोरिवली यांनी २६,५०० रुपयांचा दंड आकारला होता. हा दंड कमी करून देण्यासाठी कार्यालयातील वरिष्ठ लिपिक मिथुन विलास आडे यांनी तक्रारदाराकडे 5 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीनंतर ही रक्कम 4 हजार रुपयांवर निश्चित करण्यात आली.

ACB Action : 4 हजार रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडलं

तक्रारदाराने लाच देण्यास नकार देत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, वरळी येथे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर 1 जून 2026 रोजी सापळा रचण्यात आला. या कारवाई दरम्यान मिथुन आडे यांनी तक्रारदाराकडून 4 हजार रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले. या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 च्या कलम 7 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.