ती खूपच शो-ऑफ करत होती..; करिश्मा कपूरबद्दल असं का म्हणाली माधुरी दीक्षित?
Tv9 Marathi June 04, 2026 03:48 AM

‘दिल तो पागल है’ हा बॉलिवूडमधील क्लासिक चित्रपट मानला जातो. शाहरुख खान, माधुरी दीक्षित, करिश्मा कपूर आणि अक्षय कुमार यांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. यामधील करिश्मा आणि माधुरी यांच्यातील नृत्याची जुगलबंधी खूप गाजली होती. आता तब्बल 29 वर्षांनंतर माधुरीने या डान्सच्या शूटिंगसंदर्भातील एक मजेशीर किस्सा सांगितला आहे. प्रसिद्ध कोरिओग्राफर शामक दावरने या नृत्याच्या जुगलबंधीची कोरिओग्राफी केली होती. निशा आणि पूजा या चित्रपटातील दोन्ही भूमिकांमध्ये वाढत जाणारी स्पर्धा या नृत्यातून दाखवण्यात आली होती. विशेष म्हणजे माधुरीची भाची या गाण्याच्या शूटिंगच्या वेळी सेटवर उपस्थित होती. डान्सवर तिच्या भाचीने काय प्रतिक्रिया दिली होती, याचा खुलासा आता माधुरीने केला आहे.

माधुरीने सांगितला किस्सा

‘झूम’ वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत माधुरीने सांगितलं, “माझी भाजी तिथे सेटवर उपस्थित होती आणि ती आमचं शूटिंग पाहत होती. नंतर तिने मला सांगितलं की, ती दुसरी मुलगी (करिश्मा) खूपच शो-ऑफ (दिखावा) करण्याचा प्रयत्न करत होती. तिच्या पायाच्या बोटांकडे तू पाहिलंस का मावशी, ती बोटं दाखवत होती. त्यामुळे लोकांच्या ते लक्षात येतं.” हा किस्सा सांगताना माधुरीलाही हसू अनावर होतं. यावेळी ती करिश्माचं विशेष कौतुक करते. “करिश्मा इतकी चांगली नाचली आणि तिच्यासोबतचा तो अनुभव खूपच जबरदस्त होता. आमचं एकमेकांशी खूप चांगलं जुळू लागलं होतं. त्यामुळे सेटवर खूप चांगलं वातावरण निर्माण झालं होतं. डान्सचा तो सीक्वेन्स शूट करताना आम्हा दोघींना खूप मजा आली. ऑनस्क्रीन जरी ती जुगलबंदी असली तरी ऑफस्क्रीन आम्ही खूप मजा केली”, असं ती पुढे म्हणाली.

करिश्माला राष्ट्रीय पुरस्कार

‘दिल तो पागल है’ या चित्रपटात राहुल (शाहरुख खान) पूजाच्या (माधुरी दीक्षित) प्रेमात पडला आहे, हे लक्षात आल्यानंतर निशाच्या (करिश्मा कपूर) मनात वाढणारा मत्सर या सीनमधून अधोरेखित झाला. या डान्सच्या सीक्वेन्सने चित्रपटात महत्त्वाची भूमिका बजावली होती. माधुरी आणि करिश्मा यांच्यातील जुगलबंदीची खूप चर्चा झाली होती. 1997 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन यश चोप्रा यांनी केलं होतं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरला. तर करिश्मा कपूरला तिच्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.