Suryakumar Yadav : सूर्यकुमारचा टी 20 कर्णधारपदावरुन पत्ता कट;टीममधूनही डच्चू मिळणार!
Tv9 Marathi June 04, 2026 05:45 AM

भारतीय क्रिकेट वर्तुळातून या क्षणाची सर्वात मोठी आणि अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. बीसीसीआय सूर्यकुमार यादव याला टीम इंडियाच्या टी 20i कर्णधारपदावरुन हटवण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं जात आहे. इतकंच नाही तर निवड समितीकडून सूर्याला आगामी टी 20i मालिकेसाठी भारतीय संघातून डच्चू देण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे. सूर्याने टी 20i संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून जबरदस्त कामगिरी केली आहे. मात्र सूर्या फलंदाज म्हणून सपशेल अपयशी ठरला आहे. सूर्याला अपवाद वगळता टी 20i क्रिकेटमध्ये त्याच्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे बीसीसीआय येत्या काही तासांत सूर्याबाबत मोठा निर्णय जाहीर करणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे आता बीसीसीआय सूर्याबाबत काय निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सूर्याच्या नेतृत्वात टीम इंडियाची कामगिरी

रोहित शर्मा याने त्याच्या नेतृत्वात वर्ल्ड कप जिंकून दिल्यानंतर 2024 साली टी 20i क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. रोहितनंतर बीसीसीआयने सूर्यकुमार याला नेतृत्वाची जबाबदारी दिली. सूर्याने सार्थपणे रोहितचा वारसा चालवत स्वत:ला कर्णधार म्हणून सिद्ध केलं.
सूर्याला नेतृत्वाची जबाबदारी दिली तेव्हा तो टी 20i क्रिकेटमधील नंबर 1 फलंदाज होता.

सूर्याने त्याच्या नेतृत्वात टीम इंडियाला सलग 8 टी 20i मालिकांमध्ये विजयी केलं. तसेच टीम इंडियाने सूर्याच्याच नेतृत्वात पाकिस्तानला पराभूत करुन आशिया कप ट्रॉफी जिंकली. त्यानंतर टीम इंडियाने टी 20i वर्ल्ड कप जिंकला.

सूर्याची आकडेवारी

सूर्याने 2024 आणि 2025 या 2 वर्षात घोर निराशा केली. सूर्याला 2024 साली फक्त 429 धावा करता आल्या. तर सूर्याने 2025 साली 19 डावात 218 धावा केल्या. तर सूर्याने 2026 वर्षात 44 च्या सरासरीने 484 धावा केल्या. मात्र सूर्याला टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत बॅटिंगने खास योगदान देता आलं नाही.

सूर्याची जागा कोण घेणार?

दरम्यान आता सूर्याच्या जागी कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. टी 20i कॅप्टन म्हणून श्रेयस अय्यर हा तगडा दावेदार आहे. श्रेयसला आयपीएल स्पर्धेत नेतृत्वाचा तगडा अनुभव आहे. तसेच तिलक वर्मा याचंही नाव चर्चेत आहे. त्यामुळे आता येत्या दिवसात काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.