प्रवेशाची वेळ जवळ, पण...! सोलापूरच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयास 'एआयसीटीई'ची मिळेना मान्यता; 'बाटू'कडील संलग्नीकरणावरही निर्णय नाही
esakal June 04, 2026 10:45 AM

तात्या लांडगे

सोलापूर : राज्य शासनाच्या मंजुरीनंतर आता सोलापुरात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू होणार आहे. त्याअनुषंगाने राज्य शासनाने अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडे (एआयसीटीई) मान्यतेसाठी अर्ज केला आहे. मात्र, त्यांच्याकडून अजून मान्यता मिळालेली नाही. आता जूनअखेर ‘सीईटी’चा निकाल जाहीर होऊन अभियांत्रिकी महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया सुरू होईल. या पार्श्वभूमीवर सोलापूरचे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय यंदा सुरू होईल का, या प्रश्नाचे उत्तर सध्यातरी तंत्रशिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडेही नाही.

सोलापूरकरांची १९६० पासूनची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण केली. त्यांनी सोलापूरसाठी स्वतंत्र शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय मंजूर केले. त्यासाठी स्थानिक आमदारांनीही पाठपुरावा केला होता. तसेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनेदेखील वेळोवेळी तत्कालीन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आणि विद्यमान मंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदने दिली होती.

सोलापुरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाशी (बाटू) संलग्न असणार आहे. त्या महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यासाठी ‘एआयसीटीई’ची मान्यता बंधनकारक आहे. मान्यता देण्यापूर्वी ‘एआयसीटीई’चे अधिकारी त्या महाविद्यालयातील सर्व सोयी-सुविधींची पाहणी करतात. त्यांच्या अहवालाच्या आधारे ‘एआयसीटीई’कडून महाविद्यालयाला अंतिम मंजुरी मिळते आणि प्रवेश प्रक्रिया सुरू करता येते, असा नियम असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ही सर्व कार्यवाही करण्यासाठी अवघे २० ते २५ दिवस उरल्याचेही अधिकारी म्हणाले.

अभ्यासक्रमनिहाय प्रवेश क्षमता अशी...

  • अभ्यासक्रम प्रवेश क्षमता

  • एआय अँड मशिन लर्निंग ६०

  • कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग ६०

  • इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन ६०

इमारत दुरुस्ती-डागडुजीसाठी अजूनही नाही निधी

नवीन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या स्थापनेसाठी टप्प्याटप्प्याने नव्याने नियमित शिक्षकांची ३९ पदे आणि शिक्षकेतर ३८ पदे (यापैकी २२ नियमित व १६ बाह्य यंत्रणेद्वारे) निर्माण केली जाणार आहेत. संस्थेच्या नवीन शिक्षक व शिक्षकेतर पदांवरील तसेच बांधकाम, यंत्रसामग्री आणि उपकरणांसाठी आगामी चार वर्षांतील सुमारे १५७ कोटी ६६ लाख दोन हजार रुपयांच्या खर्चाच्या तरतुदीस मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. तसेच या शैक्षणिक वर्षापासून अभियांत्रिकीचे हे तीन पदवी अभ्यासक्रम सुरू होणार असल्याने इमारत दुरुस्ती, डागडुजी तसेच अन्य आवश्यक खर्चासाठी ११ कोटी रुपये उपलब्ध करून देण्यासही यावेळी मान्यता मिळाली.

‘एआयसीटीई’च्या मान्यतेसाठी प्रयत्न

राज्य शासनाने सोलापूरसाठी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय मंजूर केले आहे. आता या वर्षापासून प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याच्या दृष्टीने अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडे (एआयसीटीई) अर्ज केला आहे. त्यांच्याकडून मान्यता मिळाल्यानंतर प्रवेश प्रक्रिया सुरू होईल. ‘एआयसीटीई’च्या मान्यतेसाठी पाठपुरावा सुरू आहे.

- डॉ. विनोद मोहितकर, संचालक, तंत्रशिक्षण संचालनालय

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.