Eknath Shinde : छत्रपती संभाजीनगरचा भाजपच्या ताब्यात असलेला किल्ला परत मिळवण्यासाठी एकनाथ शिंदेंनी घेतला महत्वाचा निर्णय
Tv9 Marathi June 04, 2026 07:45 PM

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विधान परिषदेच्या 17 जागांवरुन महायुतीमधील स्थानिक पातळीवर अंतर्गत मतभेद मोठ्या प्रमाणात समोर आले. खासकरुन छत्रपती संभाजीनगरच्या जागेचा वाद जास्त गाजला. महायुतीत विधान परिषदेची ही जागा भाजपकडे गेली. त्यामुळे स्थानिक पातळीवरील शिवसेनेत मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण झाली. माजी मंत्री आणि शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांच्या मुलाने उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे महायुतीत कुरबुरी, संघर्ष मतभेद वाढण्याची चिन्ह दिसू लागली. एकनाथ शिंदे यांना ठाण्यातील महापौर निवासस्थानी छत्रपती संभाजीनगरमधील आमदार-खासदारांची बैठक घेऊन तोडगा काढावा लागला. एकनाथ शिंदे यांनी अब्दुल सत्तार यांना युती धर्म पाळण्याचं आवाहन केलं. त्यानंतर अब्दुल सत्तार नरमले व त्यांनी माघार घेतली.

खरंतर छत्रपती संभाजीनगर हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून शिवसेनेचा अभेद्य बालेकिल्ला होता. चंद्रकांत खैरे हे तिथले प्रमुख नेते होते. पण हळूहळू शिवसेनेची पकड ढिली होत गेली. 2022 साली शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपचं वर्चस्व वाढलं. तिथली जिल्हा परिषद आणि महापालिका आज भाजपकडे आहे. उपमुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे हे आपल्यापरीने पक्ष विस्तारासाठी प्रयत्न करत आहेत. छत्रपती संभाजीनगरवरील शिवसेनेची ताकद कमी होणं परवडणार नाही. तिथे आता भाजप आणि शिवसेनेत अंतर्गत स्पर्धा आहे.

आमदार अब्दुल सत्तार यांचं मोठं विधान

छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना अजून भक्कम करण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी खास प्लान बनवला आहे. दरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे नेते आता संदिपान भुमरे आहेत, असं आमदार अब्दुल सत्तार यांनी विधान केलय. संभाजीनगर जिल्ह्यात गटबाजीमुळे शिंदेंच्या शिवसेनेची दोन निवडणुकीत पिछेहाट झाली होती.पालकमंत्री संजय शिरसाट, अब्दुल सत्तार, उपमहापौर तथा जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्यातील वाढत्या वादामुळे कार्यकर्त्यात अस्वस्थता आहे. ही गटबाजी मोडीत काढण्यासाठी मुंबईत एकनाथ शिंदे यांनी बैठक घेतली. संभाजीनगर जिल्ह्याची पक्षाची जबाबदारी आता खासदार संदिपान भुमरे यांच्यावर असेल. महिन्यातून एक वेळेस सर्व आमदार, खासदारांची संदिपान भुमरे बैठक घेतील. तर तीन महिन्यातून एकदा मुंबईत एकनाथ शिंदे हे स्वत: बैठक घेणार आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.