पुणे - नसरापूर (ता. भोर) येथील साडेतीन वर्षांच्या बालिकेवरील लैंगिक अत्याचार व खून प्रकरणातील खटल्याची सुनावणी विशेष न्यायालयात सुरू असून, आतापर्यंत तीन अल्पवयीन मुलांसह एकूण ३५ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली आहे. सरकार पक्षाने प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, तांत्रिक पुरावे, वैद्यकीय अहवाल आणि डीएनए विश्लेषणाच्या आधारे आरोपीविरुद्ध भक्कम पुरावे न्यायालयासमोर मांडले आहेत.
या प्रकरणात आरोपी भीमराव कांबळे याला गुन्हा दाखल झाल्याच दिवशी अटक करण्यात आली होती. अटकेनंतर अवघ्या १४ दिवसांत सुमारे १,१०० पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर दोषारोप निश्चितीची प्रक्रिया पूर्ण करून २९ मेपासून पुरावा नोंदविण्याचे कामकाज सुरू करण्यात आले.
सरकार पक्षातर्फे फिर्यादी, तिचे कुटुंबीय तसेच आरोपीला बालिकेसोबत घटनास्थळाकडे जाताना पाहणाऱ्या प्रत्यक्षदर्शींच्या साक्षी नोंदविण्यात आल्या आहेत. याशिवाय, आरोपी बालिकेला घटनास्थळाकडे घेऊन जात असल्याचे दिसणारे सीसीटीव्ही फुटेज आणि त्यासंबंधीचा तांत्रिक पुरावा न्यायालयासमोर सादर करण्यात आला आहे.
या खटल्यातील तीन अल्पवयीन मुलांची साक्ष विशेष महत्त्वाची ठरली आहे. या तिन्ही मुलांनी निर्भीडपणे न्यायालयासमोर साक्ष देत आरोपी बालिकेला घटनास्थळाकडे घेऊन जात असल्याचे तसेच बंद शेडमध्ये पलंगावर तिच्यासोबत बसलेला असल्याचे पाहिल्याचे सांगितले. बालिकेला मदत करण्याच्या उद्देशाने त्यांनी शेडवर दगड मारल्याचेही साक्षीत नमूद केले. आरोपीच्या ओळख परेडीतही या मुलांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
तपासादरम्यान आरोपीने बालिकेला गाठी शेव देण्याचे आणि गाईचे वासरू दाखविण्याचे आमिष दाखवून घटनास्थळी नेल्याचे उघड झाले आहे. आरोपीने गाठी शेव खरेदी केलेल्या ठिकाणच्या साक्षीदारांचीही न्यायालयात साक्ष घेण्यात आली.
शवविच्छेदन करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची सविस्तर साक्ष, त्यासंबंधीची व्हिडिओग्राफी तसेच आरोपी लैंगिक कृत्य करण्यास सक्षम असून त्याची मानसिक स्थिती सामान्य असल्याचे वैद्यकीय दाखले विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी न्यायालयासमोर सादर केले.
घटनास्थळी बालिकेच्या ओरडण्याचा आवाज आणि शेडवर दगड मारल्याचा आवाज ऐकणाऱ्या साक्षीदारांची साक्षही नोंदविण्यात आली आहे. न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेचे अहवाल, डीएनए विश्लेषण आणि इतर तांत्रिक पुरावे सविस्तरपणे न्यायालयासमोर मांडण्यात आले. नियंत्रण नमुन्यांच्या आधारे करण्यात आलेल्या डीएनए तपासणीतून आरोपीचा गुन्ह्यातील सहभाग स्पष्ट होत असल्याचा दावा सरकार पक्षाने केला आहे.