Toxic Liquor Case : विषारी दारू प्रकरणात तपासाची व्याप्ती वाढली; मुख्य आरोपीला २१५ लिटर मिथेनॉल पुरवले, आणखी एकाला अटक
esakal June 06, 2026 03:45 AM

पुणे - भिवंडी येथील ‘रेक्स इंटरनॅशनल’ कंपनीच्या गोदामाची पुन्हा तपासणी करण्यात आली. अन्न व औषध प्रशासनाने सील केलेल्या गोदामातील ३९ ड्रममधील नमुने फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने घेऊन विश्लेषणासाठी पाठविण्यात आले आहेत. दरम्यान, या प्रकरणात वडारवाडीतील आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

फुगेवाडी आणि हडपसर परिसरातील विषारी हातभट्टी दारू प्रकरणात मृतांचा आकडा २० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून, आठ जणांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. या प्रकरणाच्या तपासात मिथेनॉल पुरवठा साखळी, आर्थिक व्यवहार आणि दारू वितरण रॅकेटचा शोध घेण्यासाठी गुन्हे अन्वेषण विभागाने तपासाची व्याप्ती वाढविली आहे. या दोन्ही गुन्ह्यांचा तपास गुन्हे अन्वेषण (सीआयडी) विभागाच्या पुणे पथकाकडून सुरू आहे.

तपासादरम्यान पोलिस कोठडीत असलेले आरोपी अरुण जगदंब चौबे (वय ५९) आणि अभिषेक अरुण चौबे (वय ३४, दोघेही वाशीगाव, नवी मुंबई) यांच्याशी संबंधित भिवंडी येथील ‘रेक्स इंटरनॅशनल’ कंपनीच्या गोदामाची पुन्हा तपासणी करण्यात आली. अन्न व औषध प्रशासनाने सील केलेल्या गोदामातील ३९ ड्रममधील नमुने फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने घेऊन विश्लेषणासाठी पाठविण्यात आले आहेत.

याशिवाय, वाशी येथील कार्यालयातून एक लॅपटॉप आणि तपासासाठी आवश्यक कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. आरोपींची बँकेतील खात्यांची माहितीही तपास पथकाने प्राप्त केली आहे.

तपासात ‘रेक्स इंटरनॅशनल’ कंपनीने ‘अविनाश कार्गो प्रा. लि.’मार्फत मुख्य आरोपी योगेश व्हानखडे याला २१५ लिटर मिथेनॉल पुरविल्याचे निष्पन्न झाले आहे. यासंदर्भात भोसरी येथील कार्यालयात चौकशी करून कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदविण्यात आले असून संबंधित कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.

या प्रकरणातील आरोपी इरफान निसार कुरेशी (वय ५०, दापोडी) याला न्यायालयाने आठ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तसेच, वडारवाडी येथील आर्यन संजीव धोत्रे (वय २२) याचा हातभट्टी दारू विक्री व्यवसाय असून, त्याचा गुन्ह्यात सहभाग आढळून आल्याने त्याला अटक करण्यात आली आहे. बनावट आधारकार्ड तयार करणाऱ्या सोमनाथ तात्याबा गावडे याचीही चौकशी करण्यात आली आहे.

मुख्य आरोपी योगेश व्हानखडे याच्याकडून हातभट्टी दारूच्या वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी दुचाकी जप्त करण्यात आली आहे. तसेच फुगेवाडी परिसरातून एक डीव्हीआर जप्त करण्यात आला असून आतापर्यंत पाच सीसीटीव्ही डीव्हीआर आणि हार्डडिस्क पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत.

दरम्यान, दापोडी येथील गुन्ह्यात भारतीय न्याय संहितेतील आणखी गंभीर कलमांची भर घालण्यात आली असून संघटित गुन्हेगारी, पुरावे नष्ट करणे आणि फसवणुकीशी संबंधित विविध कलमांनुसार तपास सुरू आहे. या प्रकरणात सहभागी असलेल्या इतर संशयितांचा शोध घेण्याचे काम वेगाने सुरू असल्याची माहिती तपास यंत्रणेकडून देण्यात आली.

अतिरिक्त पोलिस महासंचालक सुनील रामानंद, विशेष पोलिस महानिरीक्षक सुधीर हिरेमठ आणि पोलिस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी सचिन चव्हाण आणि त्यांच्या पथकाकडून तपास सुरू आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.