Pune Water Supply : पुण्यात एक दिवसाआड पाणी? आयुक्तांच्या निर्णयाकडे लक्ष; वेळापत्रक तयार करण्याचे आदेश
esakal June 06, 2026 03:45 AM

पुणे - खडकवासला धरण प्रकल्पातील घटता पाणीसाठा आणि पावसाच्या चिंतेमुळे पुणेकरांवर पाण्याचे गंभीर संकट ओढवण्याची शक्यता आहे. परिस्थितीचा सामना करण्यासाठी महापालिकेने ‘एक दिवसाआड पाणीपुरवठा’ करण्याचे नियोजन सुरू केले असून, सहा झोनमध्ये त्यांच्या भागात नवे वेळापत्रक तयार करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबतचा अंतिम निर्णय पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे.

यंदाच्या पावसाळ्यात ‘एल निनो’ या वादळाचा प्रभाव राहणार आहे. त्यामुळे यंदाच्या मान्सूनमध्ये पावसाचे प्रमाण कमी असेल. महापालिकेने १५ टक्के पाणी कपात करावी, अशी सूचना पाटबंधारे विभागाने महापालिकेला केली होती; मात्र धरणात असलेला पाण्याचा पुरेसा साठा आणि हवामान विभागाचा सुधारित अंदाज जाहीर झालेला नसल्याने एक जूनपर्यंत शहरात कोणतीही पाणी कपात करू नये, असा निर्णय पक्षनेत्यांच्या बैठकीत घेतला होता.

हवामान विभागाने २९ मे रोजी अखेर मान्सूनचा सुधारीत अंदाज जाहीर केला. त्यात सरासरीपेक्षा ९० टक्के पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. सुमारे १० टक्के पाऊस कमी असल्याने हे प्रमाणे सामान्यापेक्षा कमी असेल. त्यामुळे भविष्यात पाणीटंचाईचा प्रश्‍न गंभीर होणार आहे. या अंदाजानुसार पाणीपुरवठा विभागाने महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांच्याकडे पाणीकपातीचा प्रस्ताव पाठवला.

त्यात खडकवासला, पानशेत, टेमघर, वरसगाव आणि भामा आसखेड या धरणक्षेत्रातील उपलब्ध पाणीसाठ्याची माहिती दिली आहे. धरणातील पाणी जुलैअखेरपर्यंत शहराला उपलब्ध झाले पाहिजे, यासाठी ‘एक दिवसाआड पाणीकपात’ करणे आवश्यक आहे. त्यामुळे या निर्णयास मान्यता मिळावी, असे पत्र आयुक्तांकडे पाठविण्यात आले.

सहा झोनला पाठवले पत्र

भविष्यात ‘एक दिवसाआड पाणीपुरवठा’ करावा लागणार आहे. त्यामुळे त्यासाठी नियोजन करून सर्व भागात पाणी पोहोचणे आवश्‍यक आहे. त्यासाठी पाणीपुरवठा विभागप्रमुख नंदकिशोर जगताप यांनी स्वारगेट एक, स्वारगेट दोन, बंडगार्डन, लष्कर, चतुःशृंगी, ‘एसएनडीटी’ या सहा झोनच्या अधीक्षक अभियंता, तसेच कार्यकारी अभियंता यांना पत्र पाठवले आहे. पाणीपुरवठ्याचे नियोजन करून ते मुख्य खात्याकडे सादर करावे, असे आदेश जगताप यांनी दिले आहेत.

२५ टक्के पाणीकपात

पुणे शहरासाठी सध्या दररोज १६८१.५० एमएलडी इतके पाणी वापरले जात आहे. एक दिवसाआड पाणीपुरवठा केल्यानंतर सुमारे २५ टक्के इतकी पाणीकपात होईल. त्यातून दररोज ४२० एमएलडी पाण्याची बचत होईल. याप्रमाणे दोन महिने पाणीकपात केल्यास सुमारे २० दिवसांचे अतिरिक्त पाणी धरणात शिल्लक राहील. पावसाने ओढ दिल्यास आणीबाणीच्या स्थितीत हे बचत केलेले पाणी शहरासाठी वापरता येणार आहे.

खडकवासला धरण - ४५% पाणीसाठा

टेमघर धरणामध्ये सध्या शून्य टक्के पाणीसाठा

(टेमघर धरणातील पाणी पातळी सध्या शून्य टीएमसी असून ते पूर्णपणे कोरडे.)

(चार धरणांपैकी पानशेत धरणात सध्या सर्वाधिक २.४६ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध.)

धरणांतील पाणीसाठा

  • खडकवासला - ४५% - ०.९० टीएमसी | ४५%

  • पानशेत - २३.१३% - २.४६ टीएमसी | २३.१३%

  • वरसगाव - १६.४७% - २.११ टीएमसी | १६.४७%

एकूण साठा आणि तुलना

  • १८.८७% - गेल्यावर्षीची टक्केवारी

  • १८.७९% - यंदाची टक्केवारी

  • एकूण उपलब्ध पाणी - ५.४८ टीएमसी.

(हे पाणी केवळ पुणे शहरासाठी राखीव नसून, यामध्ये शेतीसाठीच्या पाण्याचाही वाटा आहे.)

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरीच्या ९० टक्के पाऊस पडणार आहे. भविष्यातील पाण्याचे नियोजन करण्यासाठी ‘एक दिवसाआड पाणीपुरवठा’ करण्यास मान्यता द्यावी, असा प्रस्ताव आयुक्तांकडे सादर केला आहे. हा निर्णय झाल्यास त्‍याची अंमलबजावणी करण्यासाठी सहा झोनला एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यास सांगितले.

- नंदकिशोर जगताप, प्रमुख, पाणीपुरवठा विभाग

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.