राजेश मेहता घोटाळ्यावर रोहित पवार देशातील कॉर्पोरेट क्षेत्रातून एक अत्यंत धक्कादायक आणि मोठी बातमी समोर आली आहे. तब्बल 15 लाख कोटी रुपयांच्या महसूल घोटाळ्याने संपूर्ण देश पुन्हा एकदा हादरला असून, या प्रकरणात आता राजकीय ठिणगी पडली आहे. बेंगळुरू येथील ‘राजेश एक्स्पोर्ट्स लिमिटेड’चे (Rajesh Exports Limited) मालक राजेश मेहता (Rajesh Mehta) यांच्यावर या महाघोटाळ्याचा आरोप आहे. यावरूनच आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी भाजप (BJP) आणि केंद्र सरकारवर थेट निशाणा साधला आहे. रोहित पवार यांनी एक फोटो ट्विट करत, थेट एलआयसीच्या (LIC) भूमिकेवर रोकडा सवाल उपस्थित केलाय.
आमदार रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “15 लाख कोटींचा घोटाळा करणाऱ्या राजेश मेहताचा घोटाळा जगातील सर्वात मोठा Accounting घोटाळा असणार आहे. मेहताच्या कंपनीत इतर म्यूचुअल फंड कंपन्या गुंतवणूक करण्यास टाळाटाळ करत असताना LIC ने गुंतवणूक केलीच कशी? मेहता प्रकरण अतिशय गंभीर असून SEBI सारख्या संस्था कशी माती खातात हे सिद्ध झाले आहे. यात सर्वात मोठे दुर्दैव म्हणजे LIC चा गुंतलेला पैसा हा सर्वसामान्य जनतेचा आहे, त्यामुळे जनतेच्या पैशाची देखील माती झाली आहे.”
शेअर बाजार नियामक संस्था सेबीने (SEBI) बेंगळुरू येथील प्रसिद्ध ज्वेलरी कंपनी ‘राजेश एक्स्पोर्ट्स लिमिटेड’ आणि तिचे व्यवस्थापकीय संचालक (MD) राजेश मेहता यांच्याविरोधात एक अंतरिम आदेश जारी केला आहे. सेबीच्या प्राथमिक तपासानुसार, राजेश एक्स्पोर्ट्सने आर्थिक वर्ष 2021 ते 2025 या कालावधीत आपल्या परदेशी उपकंपन्यांच्या माध्यमातून तब्बल 15.15 लाख कोटी रुपयांच्या एकूण महसुलाची चुकीची आणि फुगवून सांगितलेली माहिती दिल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
कंपनीने आपला तब्बल 99.8 टक्के महसूल केवळ कागदावर वाढवून दाखवल्याचे सेबीचे म्हणणे आहे. प्रमोटर्सच्या माध्यमातून निधीचा चुकीचा वापर करणे आणि चुकीची आर्थिक माहिती देणे, असे गंभीर आरोप कंपनीसह मेहतांवर लावण्यात आले आहेत. या आदेशानंतर सेबीने राजेश मेहता आणि त्यांच्या कंपनीला शेअर बाजारात व्यवहार करण्यास तात्पुरती बंदी घातली आहे.
या संपूर्ण प्रकरणात सर्वात मोठा आक्षेप एलआयसीच्या गुंतवणुकीवर घेतला जात आहे. बाजारातील इतर आघाडीच्या म्युच्युअल फंड (Mutual Fund) कंपन्यांनी गेल्या काही वर्षांत या कंपनीत गुंतवणूक करणे टाळले असताना, देशातील सर्वात मोठ्या सरकारी विमा कंपनीने म्हणजेच ‘एलआयसी’ने (LIC) या कंपनीत 10 टक्क्यांहून अधिक भागभांडवल खरेदी केले होते. कंपनीचे शेअर्स सातत्याने घसरत असतानाही एलआयसीने आपली गुंतवणूक कायम ठेवल्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या पैशांच्या सुरक्षेबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
राजेश मेहता यांचा जन्म 20 जून 2964 रोजी बेंगळुरू येथे झाला. ते ‘राजेश एक्स्पोर्ट्स’ या सोन्याच्या क्षेत्रातील देशातील एका नावाजलेल्या कंपनीचे अध्यक्ष आहेत. बेंगळुरूच्या सेंट जोसेफ या नामांकित शाळेतून शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी अगदी कमी वयात वडिलांच्या सराफा व्यवसायात पाऊल ठेवले. 1980 च्या दशकात राजेश मेहता यांनी आपले भाऊ प्रशांत यांच्यासोबत चांदीच्या दागिन्यांचा व्यवसाय सुरू केला होता. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांनी आपल्या मोठ्या भावाकडून अवघे 1,200 रुपये उधार घेतले होते. त्यानंतर त्यांनी या व्यवसायाचा विस्तार करत जागतिक स्तरावर सोन्याच्या शुद्धीकरणातील सर्वात मोठी कंपनी ‘व्हॅलकाम्बी’ विकत घेण्यापर्यंत मजल मारली होती. मात्र, आता सेबीच्या या धडक कारवाईमुळे आणि अब्जावधी रुपयांच्या कथित ‘अकाउंटिंग’ घोटाळ्यामुळे राजेश मेहता आणि त्यांची कंपनी पूर्णपणे अडचणीत आली असून, विरोधकांनी यावरून सरकारला धारेवर धरण्यास सुरुवात केली आहे.
आणखी वाचा