ममता बॅनर्जी आणखी अडचणीत?
Marathi June 06, 2026 03:25 PM

वाढली बंडखोरांची संख्या : ममता बॅनर्जी यांच्या बैठकीला केवळ 6 खासदार 8 आमदार उपस्थित

वृत्तसंस्था/ कोलकाता, नवी दिल्ली

नुकत्याच पार पडलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत दारुण पराभवाला तोंड द्याव्या लागलेल्या तृणमूल काँग्रेस पक्षाच्या अडचणींमध्ये अधिकच वाढ होताना दिसत आहे. या पक्षाच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्यावरील संकट अधिक गडद झाले असून बंडखोर आमदारांची संख्या अधिक वाढली आहे. बंडखोरांचे नेते रितुब्रत बॅनर्जी यांनी 70 आमदारांच्या पाठिंब्याची घोषणा केली.

या पार्श्वभूमीवर पक्षाला सावरण्याचा प्रयत्न करण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी कोलकाता येथे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या आणि लोकप्रतिनिधींच्या बैठकीचे आयोजन केले होते. तथापि, या बैठकीला केवळ सहा खासदार आणि आठ आमदार उपस्थित होते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीत पक्षाच्या भवितव्यासंबंधी विचार करण्यात आला. तसेच पुढची दिशा निर्धारीत करण्यात आली. मात्र, बहुसंख्य खासदार-आमदारांच्या अनुपस्थितीमुळे बैठकीचे महत्त्व कमी झाले, अशी टीका होत आहे. पक्ष संकटात असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

बंडाचे लोण खासदारांमध्येही…

आमदारांमध्ये झालेल्या बंडखोरीप्रमाणे तृणमूल काँग्रेसच्या लोकसभा आणि राज्यसभा खासदारांमध्येही बंडखोरी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या पक्षाचे अनेक लोकसभा सदस्य भारतीय जनता पक्षाच्या संपर्कात आहेत, असे सूत्रांचे म्हणणे आहे. कदाचित, येत्या तीन ते चार दिवसांमध्ये पक्षात मोठा भूकंप घडू शकेल, अशी स्थिती असल्याचे राजकीय तज्ञांचे म्हणणे आहे. मात्र, अद्याप अधिकृतरित्या कोणतीही माहिती किंवा घोषणा समोर आलेली नाही. लोकसभेत तृणमूल काँग्रेसचे 29 सदस्य असून राज्यसभेत 12 सदस्य असल्याचे दिसून येते.

काही बंडखोर पुन्हा बॅनर्जी यांच्याकडे ?

काही बंडखोर आमदार पुन्हा ममता बॅनर्जी यांच्याकडे परतल्याचाही दावा त्यांच्या गोटातून करण्यात येत आहे. रितुब्रत बॅनर्जी यांच्याकडे पुरेसे संख्याबळ नाही. त्यामुळे ते पक्षावर अधिकार सांगू शकणार नाहीत. पक्षनेत्या ममता बॅनर्जी याच असून त्यांना कोणाचेही आव्हान नाही, असेही त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. मात्र, रितुब्रत बॅनर्जी यांनी ही वक्तव्ये हास्यास्पद असल्याचे स्पष्ट केले.

हकीम यांचे त्यागपत्र

तृणमूल काँग्रेसचे नेते, ममता बॅनर्जी यांचे विश्वासू आणि कोलकाता शहराचे महापौर फिरहाद हकीम यांनी महापौरपदाचा त्याग केला आहे. त्यांनी ही घोषणा शुक्रवारी केली. त्यांनी दोन दिवसांपूर्वीच त्यागपत्र दिले होते, असेही वृत्त आहे. हा ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का मानला जात आहे. हकीम बॅनर्जी यांच्यासोबतच आहेत. तथापि, त्यांचेही महत्त्व आता खूप कमी झाल्याचे बोलले जात आहे.

पुन्हा पक्षांतरबंदी कायद्याची चर्चा

चार वर्षांपूर्वी महाराष्ट्रात जे राजकीय नाट्या घडले होते, तेच पश्चिम बंगालमध्ये घडताना दिसून येत आहे. खरा तृणमूल काँग्रेस पक्ष कोणाचा, यावर आता या पक्षाच्या दोन गटांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता आहे. पक्षाचे नाव आणि चिन्ह यांच्यासंबंधीचा वादही उपस्थित होणार आहे. हा वाद न्यायलयात जाण्याचीही शक्यता आहे. तेथे पुन्हा घटनेच्या दहाव्या परिशिष्टासंबंधी (पक्षांतरबंदी कायदा) काथ्याकूट होण्याचा संभव आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात केली जात आहे.

अस्तित्वाचे संकट

ड तृणमूल काँग्रेससमोर आता अस्तित्वाचे संकट, नेतृत्वाला मोठा धोका

ड महाराष्ट्राप्रमाणे तृणमूल काँग्रेसचे प्रकरणही न्यायालयात जाणे शक्य

ड तृणमूल काँग्रेसचे अनेक खासदार भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.