हजारो तरुण आपल्या वेदना व भविष्याची चिंता घेत रणरणत्या उन्हात रस्त्यावर : उद्धव ठाकरे
Marathi June 06, 2026 08:25 PM

मुंबई : कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांच्या नेतृत्त्वात नवी दिल्लीतील जंतरमंतरवर तरुणांकडून आंदोलन करण्यात आलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सुरु असलेल्या  तरुणांच्या आंदोलनासंदर्भात निवेदन जारी केलं आहे. उद्धव ठाकरे यांनी ज्या तरुणांना देशाचे भवितव्य, भाग्यविधाते म्हणतो ते वेदना व भविष्याची चिंता घेऊन रणणत्या उन्हात रस्त्यावर उतरले असल्याचं म्हटलंय. अभिजीत दीपके यांच्या नेतृत्त्वात दिल्लीतील जंतरमंतरमध्ये झालेल्या आंदोलनाला तरुणांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

“दिल्लीच्या जंतरमंतरवर कॉकरोचचे आंदोलन सुरू झाले आहे. ज्यांना आपण देशाचे भाग्यविधाते, भवितव्य म्हणतो, ते हजारो तरुण आपल्या वेदना व भविष्याची चिंता घेऊन रणरणत्या उन्हात रस्त्यावर उतरले आहेत. त्यांना ‘कॉकरोच’ म्हणून हिणवणे व न्याय नाकारणे योग्य नाही. NEET पेपर फुटीने लाखो युवा वर्ग उध्वस्त झाला आहे. असे सर्व पीडित तरुण-तरुणी कॉक्रोच बनून आक्रोश करीत आहेत. सरकारला त्यांचे म्हणणे ऐकावेच लागेल. कॉकरोच ना कमी लेखू नका, हा इशारा जंतरमंतरवरील आंदोलनाने दिला आहे!, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा न झाल्यास पुन्हा आंदोलन

नवी दिल्लीत अभिजीत दीपके यांच्या नेतृत्त्वात सुरु असलेल्या आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी सकाळी 10 ते सायंकाळी 6 पर्यंत परवानगी देण्यात आली होती. केंद्रीय शिक्षण मंत्रीधर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला नाही तर पुढच्या शनिवारी पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा दीपके यांच्याकडून देण्यात आला आहे.

अभिजीत दीपके यांच्या घराच्या सुरक्षेचा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून आढावा

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके हे अमेरिकेतून दिल्लीमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांनी जंतरमंतर येथे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर मधील वाळूज महानगर परिसरातील त्यांच्या निवासस्थानाच्या सुरक्षेचा पोलीस प्रशासनाने आढावा घेतला.

यावेळी गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते, विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश आघाव, वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी परिसराची पाहणी करून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत आवश्यक सूचना दिल्या. अभिजीत दिपके यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन सतर्क असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

हेदेखील वाचा

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.