Rohit Pawar: सरसकट कर्जमाफीसाठी राष्ट्रवादीचा एल्गार! 12 जूनपासून मोठे आंदोलन, रोहित पवारांचा सरकारला इशारा काय?
Tv9 Marathi June 07, 2026 12:45 PM

Rohit Pawar on Farmer Loan Waiver: राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना मंजूर केली आहे. विधान परिषद निवडणूक संपातच ही योजना जाहीर करण्यात येईल. महायुती सरकार 30 सप्टेंबर 2025 रोजीपर्यंतचे दोन लाखांचे कर्ज माफ करणार आहे. पण महाविकास आघाडीने राबवविलेल्या महात्मा फुले कर्जमाफी योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकर्‍यांना मोठा फटका बसणार आहे. तर जाचक अटींविरोधात मोठा रोष निर्माण झाला आहे. शेतकरी संघटनांनी आणि विरोधकांनी ही फसवी कर्जमाफी असल्याचा आरोप केला आहे. तर आता आमदार रोहित पवार यांनी सरसकट कर्जमाफीसाठी एल्गार पुकारला आहे. त्यांनी पंढरपूर येथून आंदोलनाची हाक दिली आहे.

आता बेमुदत अन्नत्याग आंदोलन

आमदार रोहित पवार यांनी एक्स हँडलवर एक पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी सरसकट कर्जमाफीसाठी आंदोलनाची हाक दिली आहे. या ट्विटमध्ये त्यांनी सरकारकडून कर्जमाफीसाठी लादण्यात आलेल्या अटी आणि शर्तींवर आक्षेप घेतला आहे. “गेल्या तीन-चार वर्षापासून मोठ्या आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची आशा होती, परंतू सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीतील जाचक अटी शर्तींमुळे बहुतांश शेतकरी कर्जमाफिपासून वंचित राहणार आहेत.” असा आरोप रोहित पवार यांनी केला.

“सरकारने कर्जमाफी योजनेतील या जाचक अटीशर्ती काढून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचा लाभ द्यावा, या मागणीसाठी छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्यासह सर्व महामानवांच्या प्रेरणेने विठुरायाच्या पंढरीत 12 जून पासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन करणार आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठीचा हा लढा आहे, सर्वांनी शक्य त्या पद्धतीने या लढ्याला सहकार्य करून शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करावा, ही विनंती! आंदोलनासाठी आठवड्याचा वेळ आहे, तोपर्यंत सरकार शेतकरी हिताचा निर्णय घेईल, ही अपेक्षा!” असे ट्विट रोहित पवार यांनी केले आहे. तर ही कर्ज वसुली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. शेतकऱ्यांना कर्जवसुली नकोय तर कर्जमाफी हवी असल्याचे ट्विट त्यांनी केले आहे.

गेल्या तीन-चार वर्षापासून मोठ्या आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची आशा होती, परंतू सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीतील जाचक अटी शर्तींमुळं बहुतांश शेतकरी कर्जमाफिपासून वंचित राहणार आहेत.

सरकारने कर्जमाफी योजनेतील या जाचक अटीशर्ती काढून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचा… pic.twitter.com/qDXwcWqD6s

— Rohit Pawar (@RRPSpeaks) June 6, 2026

या अगोदर कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना नाही फायदा

2019 मध्ये 32 लाख 29 हजारशेतकऱ्यांनी कर्जमाफी घेतली होती. त्यांचे कर्ज जर थकीत असेल तर त्यांना केवळ 50 हजार रुपयांच्या मर्यादेत कर्जमाफी देण्यात येणार आहे. नियमित कर्जदारांना सुद्धा केवळ 50 हजार रुपये देण्यात येणार आहेत. त्यांनाही किमान दोन वर्ष नियमित कर्जदार असणे ही अट आहे. परिणामी यापूर्वी कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या 12 लाख 71 हजार शेतकऱ्यांना केवळ 50 हजारांची मदत मिळणार आहे. या योजनेचा राज्यातील केवळ 16 लाख 48 हजार शेतकऱ्यांनाच लाभ होईल असा दावा करण्यात येत आहे. विरोधकांनी या जाचक अटींवर टीकेची झोड उठवली आहे. तर आता आमदार रोहित पवार यांनी 12 जूनपासून बेमुदत अन्नत्यागाचा इशारा दिला आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.