सोलापूरमध्ये सख्ख्या काकानेच पाच वर्षांच्या पुतण्याला संपवलं, खेळताना पत्र्यावरून पडल्याचा बनाव रचला पण 'असे' फुटले बिंग, नेमकं काय घडलं?
आफताब शेख, एबीपी माझा June 07, 2026 02:13 PM

Solapur Crime News: दक्षिण सोलापूर तालुक्यातील बरूर गावातून नात्याला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका नराधम काकानेच आपल्या अवघ्या 5 वर्षांच्या सख्ख्या पुतण्याला संपवल्याचे उघड झाले आहे. समर्थ यल्लाप्पा कास्तार असे मृत चिमुरड्याचे नाव आहे. या प्रकरणी संशयित आरोपी काका अंकुश परसप्पा कास्तार याच्या विरोधात मंद्रूप पोलीस ठाण्यात (Mandrup Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

Solapur Crime News: आई-वडील ऊसतोड कामगार; आजीकडे राहायचा समर्थ

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मृत समर्थचे आई-वडील दोघेही ऊसतोड कामगार आहेत. पोटाची खळगी भरण्यासाठी ते सतत बाहेरगावी असतात. त्यामुळे समर्थ हा दक्षिण सोलापूर तालुक्यातील बरूर येथील आपल्या आजीजवळ राहत होता. 4 जून रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास समर्थ हा "मी खेळायला जातो," असे सांगून घरातून बाहेर पडला होता.

Solapur Crime News: 'खेळताना पत्र्यावरून पडला' काकाचा खोटा बनाव

समर्थ घरातून बाहेर पडल्यानंतर काही वेळाने त्याचा काका अंकुश कास्तार याने समर्थला बेशुद्धावस्थेत घरी आणले. "समर्थ खेळताना पत्र्यावरून खाली पडला आणि त्यामुळे तो बेशुद्ध झाला आहे," असा बनाव अंकुशने कुटुंबीयांसमोर केला. समर्थच्या नातेवाईकांनी कोणतीही शंका न घेता त्याला तात्काळ उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी अंती समर्थचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले.

Solapur Crime News: शवविच्छेदन अहवालातून फुटले बिंग

समर्थचा मृतदेह पाहिल्यानंतर त्याच्या डोळ्याला, गळ्यावर आणि हनुवटीवर काही संशयास्पद दुखापतीच्या खुणा दिसून आल्या. त्यामुळे पोलिसांच्या उपस्थितीत मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. या शवविच्छेदन अहवालात समर्थचा मृत्यू पत्र्यावरून पडल्याने नाही, तर त्याला गळा दाबून संपवण्यात करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

Solapur Crime News: संशयित काकाला अटक

शवविच्छेदन अहवाल समोर येताच मंद्रूप पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंद केला. तसेच कुटुंबाची दिशाभूल करणाऱ्या आणि संशयित आरोपी असलेल्या काका अंकुश कास्तार याला पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. काका अंकुश याने अवघ्या 5 वर्षांच्या निष्पाप पुतण्याचा जीव का घेतला? या क्रूर कृत्यामागील नेमके कारण काय होते? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मंद्रूप पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

Nagpur Crime News: 'नीट' फेरपरीक्षा तणावातून विद्यार्थिनीनं आयुष्य संपवलं, त्या चिठ्ठीवरुन नागपूर पोलिसांचा सावळागोंधळ उघड, तपास अधिकाऱ्यावर कारवाईची टांगती तलवार; नेमकं काय घडलं?

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.