Vasai Crime: प्रेम ही खरोखरच एक अशी भावना आहे जी माणसाकडून काहीही घडवून आणू शकते. अशीच एक घटना वसईमधून (Vasai) उघडकीस आली आहे. प्रेयसीच्या आई- वडिलांनी (Crime News) लग्नाला नकार दिल्यामुळे तरुण नैराश्यात गेला होता. नैराश्यात त्या तरुणानं टोकाचं पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने मणिकपूर पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे तरुणाचा जीव वाचला. सध्या पोलिसांच्या या तत्परतेचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. नेमकं घडलं काय? सविस्तर जाणून घेऊयात.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी रात्री सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास घडली. संबंधित तरुण लग्नास नकार मिळाल्यामुळे मानसिक तणावाखाली होता. नैराश्यातून त्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. प्रेयसीच्या आई - वडिलांनी दिलेला नकार त्याला पचवणं कठीण जात होतं. त्यानं आयुष्य संपवण्यासाठी रेल्वे स्थानकाजवळील स्कायवॉकच्या दिशेनं धाव घेतली. त्याच्या मित्रांनी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र तो कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. अखेर त्याने स्कायवॉकच्या कठड्यावर चढून आत्महत्येचा प्रयत्न केला.
परिस्थिती गंभीर होत असल्याचे लक्षात येताच मित्रांनी तातडीने माणिकपूर पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच पोलिसांकडे मित्राला वाचवण्यासाठी मदतीची विनंती केली. यानंतर पोलीस ठाण्यातील एक वरिष्ठ अधिकारी आणि दोन पोलीस अंमलदार तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.पोलिसांनी अत्यंत शांतपणे आणि संयमाने तरुणाशी संवाद साधत त्याला बोलण्यात गुंतवून ठेवले. दरम्यान, एका पोलीस अंमलदाराने मागून जाऊन योग्य संधी साधत त्याला मिठी मारून सुरक्षितपणे कठड्यावरून खाली आणले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेनंतर रस्त्यावर बघ्यांची गर्दी जमली होती.
यानंतर तरुणाला माणिकपूर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्याच्या आई-वडिलांना बोलावून त्याचे समुपदेशनही करण्यात आले. तसेच तरुणाला त्यांच्या स्वाधीन केले. माणिकपूर पोलिसांनी दाखवलेल्या तत्परता, संयम आणि धाडसामुळे एका तरुणाचा जीव वाचला असून, त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
वयाचं अंतर अन् त्यात लव्ह मॅरेज, लग्नाच्या आदल्या दिवशी आईने प्रिया बापटला दिला मोलाचा सल्ला