अजित आगरकरच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने शनिवारी (६ जून) इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यासाठी भारतीय टी२० संघाची घोषणा केली आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यात आयर्लंडमध्ये २ टी२० सामने भारताला खेळायचे आहेत, तर इंग्लंडमध्ये १ जुलैपासून पाच टी२० सामने भारतीय संघ खेळेल. याशिवाय सप्टेंबरमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठीही भारतीय संघाची घोषणा झाली आहे. या संघांची घोषणा करताना निवड समितीने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. सर्वात मोठा निर्णय म्हणजे भारताचा टी२० कर्णधार बदलण्यात आला आहे.
तीन महिन्यांपूर्वी भारतीय संघाने टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात मायदेशात जिंकण्याची किमया साधली होती. मात्र असं असलं तरी अमेरिकेविरुद्धचा सामना सोडल्यात सूर्यकुमार यादवची फारशी चांगली कामगिरी फलंदाज म्हणून झालेली नाही. तो आयपीएल २०२६ मध्येही तो पूर्णपणे अपयशी ठरला. त्याला १३ सामन्यात २७० धावाच करता आल्या. तसेच सूर्यकुमारची आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये गेल्या २ वर्षात फारशी चांगली कामगिरी फलंदाज म्हणून झाली नव्हती. २०२५ मध्ये त्याने २१ सामन्यांत २१८ धावा केल्या होत्या, तर २०२६ मध्ये त्याने १४ सामन्यांत ४८४ धावा केल्या होत्या.
याशिवाय भारताला २ वर्षांनी ऑलिम्पिक आणि टी२० वर्ल्ड कप २०२८ स्पर्धा खेळायची आहे. अशात भविष्याचा विचार करता सूर्यकुमारला टी२० कर्णधारपदावरून हटवून श्रेयस अय्यरला नवा कर्णधार करण्यात आले आहे. याशिवाय सूर्यकुमारला भारतीय संघातूनही काढण्यात आले आहे. त्यामुळे आता सूर्यकुमारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कारकिर्दीवर पूर्णविराम लागल्याची शक्यता आहे.
इतकेच नाही, तर हार्दिक पांड्यालाही भारताच्या टी२० संघात जागा मिळालेली नाही. अजित आगरकर यांनी त्याला सध्या वर्कलोड मॅनेजमेंट करण्यासाठी विश्रांती दिली असल्याचे सांगितले असून त्याला आता रोटेशनमध्ये खेळवणार असल्याचे म्हटले आहे. त्याला २०२७ वनडे वर्ल्ड कपसाठी फिट ठेवायचे आहे. त्यामुळे सध्या हार्दिक भारताच्या टी२० संघाचा भाग नाही.
या दोन खेळाडूंशिवाय कुलदीप यादव आणि रिंकू सिंग या दोघांनाही भारतीय टी२० संघातून वगळण्यात आले आहे. कुलदीप यादवसाठी आयपीएल २०२६ स्पर्धा फारशी खास राहिली नव्हती. कुलदीपने १२ सामन्यांत १० विकेट्स घेतल्या. रिंकू सिंगने मात्र फिनिशर म्हणून आयपीएल २०२६ मध्ये खेळताना १४ सामन्यात ५९ च्या सरासरीने २९५ धावा केल्या होत्या. मात्र हे दोघेही भारतीय टी२० संघाचे महत्त्वाचे भाग होते. पण त्यांनाही इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यासाठी संधी मिळालेली नाही. विशेष गोष्ट अशी की सूर्यकुमारसह हार्दिक पांड्या, कुलदीप यादव आणि रिंकू सिंग हे चौघेही टी२० वर्ल्ड कप २०२६ विजेत्या भारतीय संघाचा भाग होते.