IND vs AFG: कॅप्टन शुबमन गिलचं घरच्या मैदानात चाबूक शतक, धोनी-गांगुलीचा रेकॉर्ड ब्रेक
GH News June 06, 2026 11:10 PM

टीम इंडियाने आयपीएल 2026 स्पर्धेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपल्या मोहिमेची अफगाणिस्तान विरुद्ध जबरदस्त सुरुवात केली. टीम इंडियाने मुल्लानपूरमध्ये अफगाणिस्तान विरुद्ध एकमेव कसोटी सामन्यातील पहिल्याच दिवशी (6 जून)  368 धावा केल्या. टीम इंडियासाठी ऋषभ पंत आणि साई सुदर्शन या दोघांनी अर्धशतकी खेळी केली. तर केएल राहुल आणि शुबमन गिल या दोघांनी शतक ठोकलं. शुबमनसाठी हे शतक खास ठरलं. शुबमनने त्याच्या होम ग्राउंडमध्ये हे शतक झळकावलं. शुबमनने यासह टीम इंडियाच्या 2 माजी दिग्गज कर्णधारांचा रेकॉर्ड ब्रेक केला. शुबमनने नक्की काय केलं? हे जाणून घेऊयात.

गौतम गंभीरच्या विक्रमाची बरोबरी

शुबमनने 138 बॉलमध्ये शतक झळकावलं. शुबमनने या खेळीत 11 फोरसह 1 सिक्स लगावला. तर शुबमन दिवसाचा खेळ संपला तेव्हा 143 बॉलमध्ये 103 रन्स करुन नॉट आऊट परतला. शुबमनचं आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील 20 वं आणि कसोटीतील 11 वं शतक ठरलं. शुबमनने यासह हेड कोच गौतम गंभीर याच्या 20 कसोटी शतकांची बरोबरी केली.

कसोटीत कर्णधार म्हणून शतक करणारे भारतीय

विराट कोहली : 20 शतकं, 113 डाव

सुनील गावसकर : 11 शतकं, 74 डाव

मोहम्मद अझरुद्दीन : 9 शतकं, 78 डाव

सचिन तेंडुलकर : 7 शतक, 43 डाव

शुबमन गिल : 6 शतकं, 15 डाव

गांगुली आणि धोनीचा रेकॉर्ड ब्रेक

शुबमनचं कसोटीतील कर्णधार म्हणून हे सहावं शतक ठरलं. शुबमनने यासह कर्णधार म्हणून महेंद्रसिंह धोनी आणि सौरव गांगुली या दोघांना मागे टाकलं. धोनी आणि गांगुली या दोघांनी कर्णधार म्हणून कसोटी क्रिकेटमध्ये प्रत्येकी 5-5 शतकं ठोकले होते. तर टीम इंडियासाठी टेस्टमध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रम हा विराट कोहली याच्या नावावर आहे. विराटने कसोटीत कर्णधार म्हणून 20 शतकं झळकावले होते.

तसेच शुबमनने या खेळीदरम्यान आणखी एक खास कामगिरी केली. शुबमन कर्णधार म्हणून दिवसांनुसार वेगवान 1 हजार धावा करणारा पहिला आणि डावांनुसार दुसरा भारतीय फलंदाज ठरला.

केएल राहुलचं शतक

दरम्यान टीम इंडियासाठी शुबमन व्यतिरिक्त अनुभवी फलंदाज केएल राहुल याने शतक झळकावलं. केएलने 164 बॉलमध्ये 60.98 च्या स्ट्राईक रेटने शतक पूर्ण केलं. केएलने या खेळीत 11 चौकार लगावले. केएलचं हे कसोटी कारकीर्दीतील 12 वं आणि मायदेशातील तिसरं शतक ठरलं.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.