'फक्त माहितीसाठी सांगतो, आजचं आंदोलन तर फक्त एक 'ट्रेलर' होता..' अमेरिकेतून थेट दिल्लीत धडक देत आंदोलन करताच काॅकरोच संस्थापक अभिजित काय काय म्हणाला?
परशराम पाटील, एबीपी माझा June 06, 2026 11:13 PM

Abhijeet Dipke: नीट पेपरफुटी प्रकरणात शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टीने (सीजेपी) शनिवारी दिल्लीतील जंतर मंतर येथे पाच तास आंदोलन केले. अभिजीत दीपकेनं शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करताना पाच  दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. राजीनामा न दिल्यास पुढील शनिवारी, 13 जून रोजी पुन्हा जंतर मंतर येथे आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे.

जंतर मंतर येथे आंदोलन करण्याची परवानगी

कॉकरोच पार्टीला आज (6 जून) सायंकाळी 5 वाजेपर्यंत जंतर मंतर येथे आंदोलन करण्याची परवानगी मिळाली होती, परंतु अभिजीतची प्रकृती खालावल्याने दुपारी 3:30 वाजता आंदोलन संपवण्यात आले. त्यानंतर तो सोनम वांगचुक यांच्यासोबत आंदोलनस्थळावरून निघून गेला. अभिजीत आज सकाळीच अमेरिकेतून दिल्लीला परतला. विमानतळावरून थेट जंतर मंतरला अभिजित पोहोचला. अभिजित डॉ. आंबेडकरांच्या आत्मचरित्राची आणि संविधानाची प्रत घेऊन आला होता. 

आजचं आंदोलन तर फक्त एक 'ट्रेलर' होता

दरम्यान, आंदोलनानंतर अभिजितने गर्भित इशारा दिला आहे. तो म्हणाला की, आई-वडिलांना भेटायला घरी जातोय, त्यांना भेटून वर्षाहून अधिक काळ झाला आहे. गेल्या 15 दिवसांत त्यांनी खूप त्रास सहन केला आणि धमक्यांमुळे त्यांना घर सोडावे लागले होते. आता मी त्यांना परत घरी घेऊन जाणार आहे. फक्त माहितीसाठी सांगतो, आजचं आंदोलन तर फक्त एक 'ट्रेलर' होता. एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार! 

अभिजीत जंतर मंतर येथे पाच तास थांबला

सकाळी साडे सातच्या सुमारास अभिजीत दीपके अमेरिकेतून दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाला. दीड तासानंतर तेथून निघाला. त्यानंतर प्रवक्ते आशुतोष रांकासोबत, आंबेडकरांचे आत्मचरित्र हातात घेऊन जंतर मंतरकडे गेला. अभिजीत जंतर मंतरवर पोहोचला. समर्थकांनी त्यांचे स्वागत केले आणि त्यांनी लोकांशी संवाद साधला. अभिजितने पाच छोटी भाषणे दिली. या दरम्यान, "धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा" अशा घोषणा देण्यात आल्या.

सोनम वांगचुक आंदोलनात 

साडेतीनच्या सुमारास अभिजितला अस्वस्थ वाटू लागल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. तो सोनम वांगचुक यांच्यासोबत निघून गेला.  सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक, सीपीआय(एमएल) मुक्ती महासचिव दिपांकर भट्टाचार्य, सीपीआय नेत्या ॲनी राजा आणि डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी व युवा संघटनांचे कार्यकर्तेही या आंदोलनात उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक हे आंदोलनात सामील झाले. त्यांच्यासोबत सीजेपीचे प्रवक्ते आशुतोष रांका हेही उपस्थित होते. आशुतोष हे आयआयटी कानपूरचे पदवीधर असून गेल्या वर्षी लंडनहून भारतात परतले आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.