Bar Association Election : महाराष्ट्र व गोवा वकील परिषद निवडणुकीत पुण्याचा दबदबा; २३ पैकी तब्बल आठ उमेदवार विजयी
esakal June 07, 2026 02:45 AM

पुणे - राज्यातील वकिलांची शिखर संघटना असलेल्या महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेच्या निवडणुकीत पुणे जिल्ह्याने दबदबा निर्माण केला आहे. या निवडणुकीत २३ पैकी सर्वांधिक आठ उमेदवार पुण्यातून विजयी झाले आहेत. आठमधील सहा वकील सर्वसाधारण गटातून विजयी झाले आहेत. तर महिला राखीव गटातून दोन उमेदवार विजयी झाले आहेत.

विशेष म्हणजे राज्यात दुसरा आणि तिसरा क्रमांक पुण्यातील उमेदवारानेच पटकाविला आहे. नागपूर येथील ॲड. पारिजात पांडे राज्यात पहिल्या क्रमांकाने निवडून आले आहेत. जिल्ह्यातील उमेदवारांपैकी ॲड. गणेश शिरसाट सर्वाधिक मते मिळवून विजयी झाले आहेत. त्यांनी राज्यात दुसरा क्रमांक पटकाविला आहे. त्यानंतर ॲड. राजेंद्र उमाप हे जिल्ह्यातून दुसऱ्या आणि राज्यातून तिसऱ्या क्रमांकाची मते घेऊन विजयी झाले आहेत.

महिला राखीव गटातून ॲड. रंजना भोसले आणि ॲड. माधवी पोतदार विजयी झाले आहेत. या निवडणूकीसाठी महाराष्ट्र, गोवा, दादर नगर हवेली आणि दमण दीव येथील मिळून १५५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. यंदा पहिल्यांदाच महिलांना आरक्षण देण्यात आले आहे. २५ ऐवजी २३ जागांसाठी मतदान होत आहे. यामध्ये १८ जण सर्वसाधारण गटातून विजयी झाले आहेत.

विजय उमेदवारांचा जिल्हा व विजयी उमेदवार -

- मुंबई - १

- ठाणे - १

- पुणे - ६

- सिंधुदुर्ग - १

- सोलापूर -१

- कोल्हापूर - १

- संभाजीनगर - २

- हिंगोली - १

- यवतमाळ - १

- नागपूर - २

- नाशिक - १

एकूण - १८

विजयी महिला उमेदवार -

- पुणे - २

- मुंबई - २

- नागपूर - १

एकूण - ५

दोन उमेदवार सर्वोच्च न्यायालय नियुक्त करणार -

निवडणुकीत राज्यातील २५ पैकी २३ उमेदवार विजयी झाले आहेत. उर्वरित २ उमेदवार उच्च न्यायालय निश्चित करणार आहे. हे दोन्ही उमेदवार महिला असणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव बार कौन्सिल ऑफ इंडियाकडून न्यायालयात पाठविण्यात आला आहे. पुण्यात वाढलेली नोंदणी आणि त्याच तुलनेत झालेले मतदान यामुळे यंदा पुण्याने बाजी मारली आहे.

पुण्यातील विजयी वकील -

- ॲड. गणेश शिरसाट

- ॲड. राजेंद्र उमाप

- ॲड. विठ्ठल कोंडे - देशमुख

- ॲड. राजेंद्र अनभुले

- ॲड. विकास ढगे-पाटील,

- ॲड. अहमदखान पठाण

- ॲड. रंजना भोसले

- ॲड. माधवी पोतदार

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.