एलपीजी गॅस दरवाढीवर शरद पवार देशभरात दैनंदिन वापरातील आणि जीवनावश्यक वस्तूंचे दर आधीच गगनाला भिडलेले असताना, केंद्र सरकारने (Central Government) रविवारी सर्वसामान्य जनतेला महागाईचा आणखी एक मोठा झटका दिला आहे. घरगुती वापराच्या एलपीजी गॅस सिलिंडरच्या (LPG gas price Hike) दरात थेट 29 रुपयांची वाढ केली आहे. या निर्णयामुळे सामान्य नागरिकांच्या घरातील किचनचे बजेट पूर्णपणे कोलमडणार आहे. ही दरवाढ 14.2 किलोच्या सिलिंडरवर करण्यात आली असून, गेल्या तीन महिन्यांत घरगुती गॅसच्या किमतीत झालेली ही दुसरी मोठी वाढ आहे. केंद्राच्या या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी (पंतप्रधान नरेंद्र मोदी) यांच्या धोरणांवर कडाडून टीका केली आहे.
या दरवाढीवर भाष्य करताना शरद पवार म्हणाले की, “सातत्यानं हे दर वाढवतायेत, या सगळ्या गोष्टीचा परिणाम आज सामान्य माणसाच्या प्रपंचावर होतोय. प्रधानमंत्र्यांनी सुरुवातीला आम्ही महागाई नियंत्रित ठेवतोय, असं सांगितलं. पण, नियंत्रित याचा अर्थ टप्प्या टप्प्यानं हा धक्का द्यायचा हे त्यांचं सूत्र आहे, त्याची राजकीय किंमत सत्ताधाऱ्यांना योग्य वेळी कळेल,” असे म्हणत त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधलाय.
दरम्यान, या नव्या दरवाढीनंतर आता राजधानी दिल्लीत 14.2 किलोच्या सिलिंडरची किंमत 913 रुपयांवरून थेट 942 रुपयांवर पोहोचली आहे. तर देशातील इतर भागांप्रमाणेच मुंबईतही 29 रुपयांचीच वाढ झाली असून, मुंबईतील दर 912.50 रुपयांवरून 941.50 रुपयांवर जाऊन पोहोचले आहेत. यापूर्वी 7 मार्च रोजी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 60 रुपयांची वाढ करण्यात आली होती. पेट्रोल-डिझेल (Petrol-Diesel) व दैनंदिन वापरातील अन्य वस्तूंच्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक अगोदरच मेटाकुटीला आला असताना, आता गॅस सिलेंडरच्या दरांनी गरिबांचे कंबरडे मोडले आहे.
एलपीजी गॅसचे उत्पादन करणाऱ्या सरकारी तेल कंपन्या अजूनही प्रत्येक घरगुती सिलिंडरमागे 703 रुपयांचा तोटा सहन करत आहेत. त्यामुळे आगामी काळात घरगुती गॅस सिलिंडरचे भाव आणखी वाढण्याची भीती बाजार तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे. काही दिवसांपूर्वीच 1 जून रोजी पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक वापराच्या दरात 42 रुपयांची वाढ केली होती. धक्कादायक बाब म्हणजे, गेल्या पाच महिन्यांत 19 किलोच्या कमर्शियल सिलिंडरचे दर तब्बल दुप्पट झाले आहेत. 1 जानेवारीपूर्वी 19 किलोच्या सिलिंडरचा दर 1580 रुपये होता, तो 1 जून रोजी थेट 3113.50 रुपयांवर पोहोचला आहे. पेट्रोल-डिझेल, गॅस आणि अन्नधान्याचे दर सातत्याने वाढत असल्यामुळे सर्वसामान्यांच्या चिंता वाढल्या आहेत. त्यातच आगामी काळात पावसाने ओढ दिल्यास महागाईचा हा भडका आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा