शिवसेना शिंदे गटाचा काँग्रेसला मोठा दणका, साहेबराव कांबळे यांच्यासह कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश..
Tv9 Marathi June 07, 2026 05:45 PM

विधान परिषद निवडणुकीमध्ये ऐनवेळी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार साहेबराव कांबळे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. ज्यानंतर मोठी खळबळ उडाली. साहेबराव कांबळे यांनी अचानक अर्ज मागे घेतल्याने महाविकास आघाडीला निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडण्याची नामुष्की आली. या झालेल्या संपूर्ण नाट्यमय घडामोडीमुळे जिल्हा काँग्रेस कमिटीकडून साहेबराव कांबळे यांना काँग्रेस प्रदेश सरचिटणीस पदावरून आणि पक्षातून काढण्यात आले. यवतमाळ विधान परिषद निवडणुकीत मविआ अधिकृत उमेदवार साहेबराव कांबळे यांनी उमेदवारी माघारी घेतल्यानंतर  माणिकराव ठाकरे यांच्या निवासस्थानी बैठक झाली. काँग्रेसचे यवतमाळ विधान परिषद निवडणुकीतून माघार घेणारे साहेबराव कांबळे यांनी आज अखेर शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. साहेबराव कांबळे यांच्यासह शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्तेही शिवसेनेत दाखल झालेत. यामुळे आता यवतमाळमध्ये शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली आहे. या पक्षप्रवेशादरम्यान संजय राठोड हे देखील उपस्थित होते. साहेबराव कांबळे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा रंगताना दिसली.

साहेबराव कांबळे यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशाने यवतमाळ जिल्ह्यात काँग्रेसला मोठे खिंडार पडले. महत्वाच्या पदावर असलेल्या अनेकांनी साहेबराव कांबळे यांच्यासोबत शिवसेना शिंदे गटात काँग्रेसला सोडचिठ्ठी देत प्रवेश केला.  साहेबराव कांबळे यांच्या पक्षप्रवेशानंतर बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठे विधान केले.

एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, विधान परिषदेचे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार साहेबराव कांबळे यांनी कार्यकर्त्यांसोबत शिवसेनेत प्रवेश केला. या भागात संजय राठोड यांची ताकद वाढविण्यात यश येईल. वीटभट्टीवर काम करणाऱ्या महिलांना न्याय देण्याच काम साहेबराव करतील, साहेबराव तुम्ही उमेदवारी मागे घेतलीच आणि शिवसेनेबरोबर काम करण्यासाठी सज्ज झाले ते मोठे आहे.

त्यांनी आमच्या पालकमंत्र्यांना सांगितले की, मतांच्या आकडेवारीत फरक आहे. आज महायुतीचाच उमेदवार तिकडे जिंकून येणार हे त्यांना माहिती होते. त्यामुळे उमेदवारीपेक्षा लोकांचे काम करणे महत्वाचे होते. 17 च्या 17 उमेदवार महायुतीने निवडून येणार आहे . हे लोक मोदींचा विरोध करत आहेत.

साहेबराव कांबळे यांच्यासोबत असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. यवतमाळ महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार साहेबराव कांबळे यांनी अचानक माघार घेतली. संख्याबळ जुळत नसल्याने मी निवडणुकीतून माघार घेत असल्याचे कांबळे यांनी त्यावेळी सांगितले होते. मात्र, तो अत्यंत मोठा झटका महाविकास आघाडीकरिता होता.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.