<<अक्षय मोटेगावकर>>
मराठी पॉडकास्ट ऐकणाऱ्या मंडळींमध्ये लोकप्रिय असलेले ‘आरपार’ हे यूटय़ूब चॅनेल. मान्यवरांना बोलतं करत बोलणाऱ्या आणि ऐकणाऱ्यांच्या काळजाशी थेट संवाद साधणारे हे चॅनेल ऐकावे असेच…
बऱ्याच वेळा काहीतरी हलकंफुलकं ऐकायचा मूड असतो. फार काही बोजड, विचार करायला लावणारे असे काही नको असते. तेव्हा मी ‘आरपार’ या यूटय़ूब चॅनेलवरचे पॉडकास्ट ऐकतो. ‘आरपार’चे बरेच व्हिडीओज शॉर्ट्स किंवा रीलच्या स्वरूपात आपल्याला इन्स्टाग्राम, फेसबुक किंवा यूटय़ूबवर पाहायला किंवा ऐकायला मिळतात. मराठी पॉडकास्ट ऐकणाऱ्या मंडळींना हे चॅनेल तसे ओळखीचे. अडीच लाखांहून अधिक सबक्रायबर्स आणि 1700 हून अधिक व्हिडीओज असलेले हे चॅनेल. यात ‘वुमन की बात’, ‘बॉईज टॉक’ आणि ‘आरपार कॅफे’ अशा शीर्षकाखाली विविध क्षेत्रातील दिग्गजांशी संवाद साधला जातो. ‘वुमन की बात’मध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांतील महिला वक्त्या, ‘बॉयज टॉक’मध्ये पुरुष वत्ते आणि ‘आरपार कॅफे’मध्ये राजकारणी, कलाकार, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय विश्लेषक यांच्या सोबतच्या गप्पा असतात.
‘आरपार’चा आवडलेला पॉडकास्ट म्हणजे ‘वुमन की बात’मध्ये मुग्धा गोडबोले यांनी ज्येष्ठ संगीता अभ्यासक डॉ. मृदुला दाढे यांच्याशी साधलेला संवाद. यात त्या हिंदी चित्रपट संगीत, साहिर, लतादीदी, गुलजारजी, श्रीनिवास खळे, रोशन आणि इतर महान व्यक्ती, गाण्यांमागच्या गमतीजमती, एखाद्या गाण्यातील सूर लावण्याच्या पद्धती, शब्दांची गेयता आणि परिणामकारकता यावर भरभरून बोलल्या आहेत. 1950-60 च्या भारतीय चित्रपट संगीताच्या सुवर्णकाळाबद्दल त्यांचं भरभरून बोलणं, त्यांचा अभ्यास, निरीक्षण हे ऐकण्यासारखे आहे. अभिनेत्री मुक्ता बर्वेसोबतचा पॉडकास्टही ऐकावा असाच. प्रार्थना बेहेरेच्या पॉडकास्टमध्ये अभिनेत्यांबद्दलच्या सगळ्या भ्रामक समजुती गळून पडतात, त्यांचे संघर्ष समजतात. तृतीयपंथीयांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या गौरी सावंत यांच्याशी केलेल्या गप्पा ऐकताना कधीतरी नकळत आपल्याही डोळ्यांत पाणी तरळून जाते. ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या पत्नी माधवी महाजनी यांच्या मुलाखतीतून त्यांची बाजूही कळते. वास्तवाची जाणीव होती. रवींद्र महाजनी यांचा मृत्यू झाल्यावर समाज माध्यमांमध्ये जो धुरळा उठला होता तो किती अनाठायी होता हेही जाणवते. ‘वुमन की बात’मधील इतरही अनेक भाग श्रवणीय आहेत.
मैथिली आपटे यांनी केलेले ‘बॉईज टॉक’मधील संकर्षण कऱहाडे आणि सौरभ भोसले (दोन भाग) हे पॉडकास्ट आपल्याला खळखळून हसवतात. यातीलच अभिनेते स्वप्नील राजशेखर यांच्यासोबतचा भागही भन्नाट झालेला आहे. वडिलांच्या आठवणी, राजशेखर या आडनावामागची कहाणी, नकला आणि कोल्हापूरच्या रांगडय़ा भाषेवरचे प्रेम ऐकताना फार छान अनुभव येतो. पंडित विजय घाटे यांच्याशी साधलेला संवाद म्हणजे साधना, तपश्चर्या काय असते, भारतीय गुरुशिष्य परंपरा कशी समृद्ध आहे, आपण इतर कलाकारांचा कसा सन्मान केला पाहिजे हे सारं दर्शवणाराच.
‘आरपार कॅफे’मधील मराठी अभिनेते गिरीश कुलकर्णी यांच्यासोबतची मुलाखत आपल्या आयुष्याबद्दलच्या संकल्पनांना छेद देत आयुष्याच्या, कर्तृत्वाच्या, प्रसिद्धीच्या, मिळकतीच्या, समाधानाच्या संकल्पनांचा मागोवा घेण्यास भाग पाडते. राजकीय पटलावर वलयांकित असणाऱया चेहऱयांसोबतचा पॉडकास्ट म्हणजे या राजकीय मंडळींची वेगळी बाजू दाखवणाराच. हे पॉडकास्ट ऐकल्यावर जाणवेल की, यातील बरेच पॉडकास्टस् हे काळजात आरपार घुसतात. नक्की ऐका!
(लेखक कॉर्पोरेट क्षेत्रात कार्यरत असून मुक्त लेखक आहेत.)