घरगुती गॅस 29 रुपयांनी महागला, शरद पवारांची मोदी सरकारवर टीका; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची 'योग्यवेळी' प्रतिक्रिया
रजत वशिष्ठ, एबीपी माझा June 07, 2026 07:43 PM

नागपूर: सर्वसामान्य नागरिकांची झोप उडवण्याचं काम आज सकाळी सकाळीच सरकारने केलंय. कारण, झोपेत असलेल्या सर्वसामान्य नागरिकांना घरगुती गॅस सिलेंडरच्या दरवाढीचा फटका बसला असून आज मध्यरात्रीपासून घरगुती गॅस सिलेंडरचे (gas cylinder) दर 29 रुपयांनी वाढले आहेत. देशभरात दैनंदिन वापरातील आणि जीवनावश्यक वस्तूंचे दर आधीच गगनाला भिडलेले असताना, केंद्र सरकारने घरगुती वापराच्या एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाल्याने सर्वसामान्यांसह विरोधकांनीही केंद्र सरकारवर जोरदार टीका केलीय. केंद्राच्या या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) यांनी आपली पहिली प्रतिक्रिया देत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणांवर कडाडून टीका केली आहे. आता, या निर्णयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली असून शरद पवारांच्या टीकेलाही उत्तर दिलंय. 

केंद्र सरकारच्या गॅस दरवाढीच्या निर्णयामुळे सामान्य नागरिकांच्या घरातील किचनचे बजेट पूर्णपणे कोलमडणार आहे, ही दरवाढ 14.2 किलोच्या सिलिंडरवर करण्यात आली असून, गेल्या तीन महिन्यांत घरगुती गॅसच्या किमतीत झालेली ही दुसरी मोठी वाढ आहे. या दरवाढीवरुन खासदार शरद पवार यांनी केंद्राच्या धोरणावर टीका केली. "सातत्यानं हे दर वाढवतायेत, या सगळ्या गोष्टीचा परिणाम आज सामान्य माणसाच्या प्रपंचावर होतोय. प्रधानमंत्र्यांनी सुरुवातीला आम्ही महागाई नियंत्रित ठेवतोय, असं सांगितलं. पण, नियंत्रित याचा अर्थ टप्प्या टप्प्यानं हा धक्का द्यायचा हे त्यांचं सूत्र आहे, त्याची राजकीय किंमत सत्ताधाऱ्यांना योग्य वेळी कळेल," असे म्हणत त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. आता, या दरवाढीचं समर्थन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी युद्धजन्य परिस्थितीचं कारण पुढे केलं आहे. 

युद्धजन्य परिस्थितीमुळे जगातील एकही देश असा नाही, जिथे पेट्रोल डिझेल गॅसचे भाव वाढलेले नाही. इंधनाचे दर सगळीकडे वाढलेले आहेत. निश्चितपणे केंद्र सरकार त्याची चिंता करत आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गॅस सिलेंडरच्या दरवाढीवर दिली. तसेच, शरद पवारांनी केलेल्या टीकेवरही ते बोलले, यापूर्वीही जगात इंधनाचे दर वाढल्यावरच देशात दर वाढले आहेत आणि कमी झाल्यावर कमीही झाले आहेत. त्यामुळे, योग्यवेळी योग्य निर्णय होईल, असे फडणवीसांनी म्हटले.

ड्रग्जविरुद्ध कारवाई सुरूच राहणार

ड्रग्ज विरोधात देशात, राज्यात मोहीम चालली आहे, गुप्त माहितीच्या आधारावर कारवाया सुरू आहेच. कुठल्याही परिस्थितीत त्याची पाळेमुळे खणून काढणे हा प्रयत्न सुरू आहे. वेगवेगळे युनिट्स त्यामध्ये काम करत आहे, दररोज कुठे ना कुठे ही कारवाई सुरुच राहणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

अल निनोचा प्रभाव, पाऊस कमी

यंदा अल निनोचं वर्ष आहे, सरासरी पाऊस जरी 92 टक्के असला, तरी मराठवाडा, पश्चिम विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात कमी पाऊस पडण्याची संभावना आहे. सरकारकडून शेतकऱ्यांना याबाबत सातत्याने सांगितलं जात आहे. दुबार पेरणीची वेळ येऊ नये, कमी पावसातही जेवढे जास्तीत जास्त नुकसान टाळता येईल, नुकसान कमीत कमी व्हावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्‍यांनी दिली.

ई85 फ्युअलचा महाराष्ट्राला सर्वाधिक लाभ

ई 85 फ्युअलचा सर्वात जास्त लाभ महाराष्ट्राला होणार आहे. ज्या प्रकारे केंद्र सरकारकडून इथेनॉल ब्लेंडिंगमध्ये 100% इथेनॉल वर चालणाऱ्या गाड्याला प्राथमिकता दिली जात आहेत. महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल, अशी माहिती मुख्यमंत्र्‍यांनी दिली.

Sunil Tatkare: रोहित पवारांना कोण विचारतंय? सुनिल तटकरेंनी भाजप प्रवेशाची हिस्ट्रीच काढली; म्हणाले, हडपसरमधून उमेदवारी..

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.