विदर्भात उष्माघाताने रानगव्याचा मृत्यू; नालासोपाऱ्यात कडक उन्हामुळे चारचाकी गाड्या जळाल्या, मान्सूनची प्रतीक्षा
प्रभाकर कुडाळकर, एबीपी माझा June 08, 2026 12:13 AM

मुंबई : एकीकडे सर्वांनाच मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा लागली असताना दुसरीकडे उन्हाळ्याची (Summer) धग आजही कायम आहे. दुपारच्या सुमारास उन्हामुळे अंगाची लाहीलाही होतानाचे चित्र पाहायला मिळते. विदर्भातही पारा 40 अंशाच्या पुढेच असून मुंबईतही उन्हाची तीव्रता पाहायला मिळत आहे. नालासोपारा पूर्वेतील सर्वोदय नगर, बावशेत पाडा परिसरात रविवारी दुपारी खुल्या मैदानात पार्किंग करून ठेवलेल्या पाच चारचाकी वाहनांना अचानक आग लागल्याची घटना घडली. त्यात दोन गाड्या पूर्णपणे जळून खाक झाल्या आहेत. तर तीन गाड्यांना किरकोळ आगी लागल्या आहेत. वाढत्या उष्णतेमुळे आग (Fire) लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

वसई विरारमधील नालासोपाऱ्यात उन्हामुळे चारचाकी वाहने जळाल्याची घटना घडली असून  खुल्या मैदानात पार्किंग करून ठेवलेल्या पाच चारचाकी वाहनांना अचानक आग लागली होती. घटनेची माहिती मिळताच वसई विरार शहर महानगरपालिकेचे अग्निशमन दलाचे  कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. कर्मचाऱ्यांनी  होजच्या साहाय्याने पाण्याचा मारा करत कूलिंग पद्धतीने आग विझवली. सुमारे दीड तासांच्या प्रयत्नांनंतर आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यात आली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी काही वाहनांचे नुकसान झाले आहे. आजचे वसई-विरार तापमान हे कमाल तापमान सुमारे 34°C येवढे नोंदवले गेले होते. त्यामुळे, गाड्यांना आग उष्णतेमुळे लागल्या का कुणी जाणून बुजून लावल्या याचा तपास आता पोलीस करत आहेत.

चंद्रपुरात उष्माघाताने रानगव्याचा मृत्यू

चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातल्या झरण जंगलात एका रानगव्याचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. झरण परिसरात एका रानगव्याचा जंगलालगत असलेल्या रस्त्याच्या कडेला आज मृतदेह आढळून आला. हा मृत्यू उष्माघाताने झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. घटनेची माहिती ग्रामस्थांनी वनविभागाला दिली. हॅबिटॅट कन्झर्वेशन सोसायटीचे सदस्य वनविभागासह घटनास्थळी पोचले. मृत शरीरावर कुठल्याही जखमा आढळून आल्या नाही. पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. प्राजक्ता लेनगुरे यांना पाचारण करण्यात आले. घटनास्थळी शवविच्छेदन करण्यात आले. प्रथमदर्शी उष्माघाताने रानगव्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील उच्चांकी तापमानाचा फटका मानवासह वन्यजीवांना सुद्धा बसत आहे.

एक्स PSI ते तहसीलदार, लाचखोर अधिकारी विजय चव्हाण नेमकं कुठले; सोशल मीडियात सक्रीय, फॉलोअर्स किती?

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.