सुनेत्रा पवार यांचा बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत विजय झाला, विधानसभेचं सदस्यत्व मिळताच त्यांनी आपल्या राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला. दरम्यान सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर आता छगन भुजबळ यांची वर्णी लागणार असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं निवासस्थान असलेल्या देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान या बैठकीमध्ये राष्ट्रवादीच्या राज्यसभेच्या सदस्याबाबत अंतिम निर्णय होणार आहे. राज्यसभेसाठी मंत्री भुजबळ यांचं नाव आघाडीवर आहे.
मात्र त्यासाठी भुजबळ यांनी एक अट घातली आहे. ती म्हणजे भुजबळ हे राज्यसभेवर जाण्यासाठी तयार आहेत, मात्र समोर आलेल्या माहितीनुसार आपला पुतण्या समीर भुजबळ यांना मंत्रिपद मिळावं अशी भुजबळांची इच्छा आहे. दरम्यान आज देवगिरी बंगल्यावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीची कोअर कमिटीची बैठक होत आहे. या बैठकीला राष्ट्रवादीचे ज्येष्ठे नेते प्रफुल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांची उपस्थिती आहे. विशेष म्हणजे या बैठकीला पहिल्यांदाच समीर भुजबळ हे उपस्थित असलल्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे. समीर भुजबळ यांना मंत्रिपद मिळू शकतं अशी चर्चा या बैठकीमुळे आता सुरू झाली आहे.
या बैठकीमध्ये राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी कोणाची वर्णी लागणार हे फायनल होणार आहे. यामध्ये छगन भुजबळ यांचं नाव आघाडीवर आहे. मात्र अजून याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. ही बैठक संपल्यानंतर राष्ट्रवादीकडून राज्यसभेवर नेमकं कोण जाणार? याची माहिती समोर येणार आहे. तसेच समीर भुजबळ यांना मंत्रिपद मिळणार का? हे देखील स्पष्ट हेऊ शकतं. त्यामुळे आता या बैठकीकडे राज्यातल्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून राज्यसभेसाठी भुजबळांच्या नावाची चर्चा सुरू आहे. मात्र समोर आलेल्या माहितीनुसार जर भुजबळांची राज्यसभेवर वर्णी लागली तर समीर भुजबळ यांना राज्यात मंत्रिपद मिळावं अशी भुजबळांची इच्छा असल्याची माहिती समोर येत आहे.