दोन वर्षांपूर्वी 7 जून 2024 रोजी एका हॉरर चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या चित्रपटातील भूताला बनवण्यातच जवळपास वर्षभराचा काळ लागला होता. अवघ्या 30 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 132 कोटी रुपयांचा गल्ला जमवत निर्मात्यांना मालामाल केलं होतं. या चित्रपटामुळे मुख्य भूमिकेतील कलाकारांचंही नशीब फळफळलं. कारण हिरो आणि हिरोईन हे दोघंही त्यावेळी मोठे स्टार नव्हते.
या चित्रपटात अभय वर्माने बिट्टूची मुख्य भूमिका साकारली होती. तर मोना सिंह त्यांच्या आईच्या भूमिकेत होती. जेव्हा बिट्टूला समजतं की त्याच्या कुटुंबावर एक शाप आहे आणि मुंज्या नावाचं भूत त्याच्या मागे लागलं आहे, तेव्हा त्याची झोपच उडते. हा मुंज्या फक्त बिट्टूलाच दिसू लागतो.
या चित्रपटात अभिनेत्री शर्वरी वाघ मुख्य भूमिकेत होती. अभय आणि शर्वरी त्यावेळी सर्वसामान्यच कलाकार होते, जे बॉलिवूडमध्ये एका मोठ्या संधीची प्रतीक्षा करत होते. या चित्रपटाने 132 कोटी रुपये कमावत सर्वांनाच चकीत केलं होतं. शेवटपर्यंत या चित्रपटाच्या कथेनं प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवलं होतं.
या चित्रपटाचं नाव आहे ‘मुंज्या’. दमदार कथानक, जबरदस्त व्हीएफएक्स आणि कलाकारांचं उत्तम अभिनय या जोरावर ‘मुंज्या’ने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. मॅडॉक फिल्म्सच्या या हॉरर कॉमेडी चित्रपटाचा बजेट फक्त 30 कोटी रुपये होता. कोकणातल्या कथेवर आधारित या चित्रपटात मराठी कलाकारही होते.