Kangana Ranaut on Marriage: बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाणारी कंगना रनौत (Kangana Ranaut) सध्या तिच्या आगामी 'भारत भाग्य विधाता' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान कंगनाने महिलांचे हक्क, करिअर आणि समाजातील त्यांची भूमिका याविषयी अत्यंत स्पष्टपणे आपली मते मांडताना दिसतेय. या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने अनेक ठिकाणी मुलाखती देताना ती दिसतेय. अशाच एका मुलाखतीची सध्या चर्चा आहे. यात अभिनेत्री स्मिता तांबेने लग्नाबद्दल प्रश्न विचारला त्यावेळी कंगनाच्या उत्तराची मनोरंजन विश्वात चर्चा रंगलीय. लग्न माझ्यासाठी कधीच प्राधान्याची गोष्ट नाही' असं ती म्हणलीय. शिवाय, गिरीजा ओक (Girija Oak) खूप लवकर आई बनणं दुःखद असल्याचंही ती म्हणाली.
एका मुलाखतीत अभिनेत्री स्मिता तांबेने कंगनाला लग्नासंबंधीत प्रश्न विचारला. लग्नाच्या प्रश्नावर कंगनाने तिच्या खास शैलीत मिश्कील उत्तर दिलं. ती म्हणाली, "मला लग्न करायचं आहे, पण सध्या माझं संपूर्ण लक्ष कामावर आहे." आयएएनएसशी संवाद साधताना ती बोलत होती. त्यावेळी स्मिता तांबे म्हणाल्या की, कंगना त्यांच्या एका प्रश्नाचं उत्तर देत नाहीये आणि तो प्रश्न म्हणजे ती लग्न कधी करणार? यावर कंगना हसत म्हणाली, "आमच्या गप्पांचा विषय कोण आपल्या आयुष्यात काय करतंय हा नव्हता. आम्ही आयुष्यातील अनुभवांबद्दल बोलत होतो. पण हो, स्मिता माझ्यासाठी स्थळ मात्र शोधत आहेत."
यावेळी यशस्वी महिलांना लग्नाचा निर्णय घेण्यासाठी इतका वेळ का लागतो, असा प्रश्न कंगनाला विचारण्यात आला. त्यावर ती म्हणाली, "प्रत्येकाची आयुष्याची वाटचाल वेगळी असते. माझ्यासोबत बसलेल्या तिघीही विवाहित आहेत. दोघींना तर मुलंही आहेत. प्रत्येकाचं आयुष्य असतं. उदाहरणार्थ, गिरिजा खूप लहान वयात आई बनली, जे कोणासाठीही आव्हानात्मक असू शकतं. माझ्या दृष्टीने ते दुःखद आहे. आम्ही आमची मुलं पार्टीलाही घेऊन जातो. पण, प्रत्येक महिलेचा प्रवास वेगळा असतो.".
ती पुढे म्हणाली, "मी लग्न या संस्थेवर विश्वास ठेवते. असं नाही की मला लग्नावर विश्वास नाही. पण खरं सांगायचं तर, बराच काळ लग्न माझ्या प्राधान्यक्रमात नव्हतं. माझं करिअर हेच नेहमी माझं सर्वात मोठं प्राधान्य राहिलं."
कंगनाने तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांचीही आठवण सांगितली. "मी 16-17 वर्षांची असताना काम करण्यास सुरुवात केली होती. पण मला खरं यश 29 व्या वर्षी मिळालं, जेव्हा 'तनु वेड्स मनु' आणि 'क्वीन'सारखे चित्रपट आले. त्यानंतर आयुष्यात अनेक महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागले. माझे आई-वडील म्हणायचे, 'ही कसली विचारसरणी? मुली अशा प्रकारे विचार करत नाहीत.' पण मला नेहमी वाटायचं की मला माझ्या पद्धतीने पुढे जायचं आहे."
नर्सेसना मिळणारा कमी पगार आणि त्यांचे कठीण काम याबाबत विचारलेल्या प्रश्नावर कंगना म्हणाली, "ज्या समाजात प्रत्येक गोष्ट केवळ आर्थिक व्यवहार बनते, तो समाज हळूहळू अधोगतीकडे जातो. घरातील कामांबाबतही आपण पैशांच्या भाषेत बोलतो. एखादी महिला कपडे धुते, तर आपण चार हजार रुपये वाचवतो; ती स्वयंपाक करते, तर सहा हजार रुपये वाचतात, असं म्हटलं जातं. ही विचारसरणी मला भावनिकदृष्ट्या अस्वस्थ करते."
ती पुढे म्हणाली, "लोकांनी कामाचा सन्मान केला पाहिजे, त्याकडे भावनिक दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे आणि त्यांचं काम अधिक सोपं करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असं झालं तर देशाची अर्थव्यवस्था आपोआप मजबूत होईल. या चित्रपटात नर्सची भूमिका साकारून मी त्यांचं धैर्य, स्वातंत्र्य आणि समर्पण दाखवण्याचा प्रयत्न केला आहे."
कंगनाच्या 'भारत भाग्य विधाता' या चित्रपटाबद्दल बोलायचं झाल्यास, हा चित्रपट 2008 मधील मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. कामा रुग्णालयात घडलेल्या सत्य घटनांपासून प्रेरित असलेल्या या चित्रपटात कंगना नर्स गीता माधवची भूमिका साकारत आहे. रुग्णांची सेवा करताना कर्तव्याला सर्वोच्च स्थान देणाऱ्या एका समर्पित नर्सची कथा या चित्रपटातून दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटात कंगना रनौतसोबत गिरिजा ओक, स्मिता तांबे, अमृता नामदेव, ईशा डे, प्रिया बेर्डे, आशा शेलार, सुहिता थत्ते, रसिका अगाशे, आदित्य मिश्रा आणि जाहिद खान हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन मनोज तापडिया यांनी केले असून 'भारत भाग्य विधाता' हा चित्रपट 12 जून रोजी प्रदर्शित होणार आहे.