Gold Rate जळगाव : आंतरराष्ट्रीय घडामोडींचा सोन्याच्या दरावर देखील परिणाम झाला आहे. एमसीएक्स आणि सराफा बाजारात सोन्याच्या आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे. जळगावात गेल्या 24 तासात सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे. सोने दरात 500 रुपयांची घसरण झाली आहे. सोन्याचे दर 151000 रुपयांवरुन घसरुन 150500 रुपयांवर आले आहेत. दुसरीकडे चांदीच्या दरात 3000 रुपयांची घसरण होऊन एक किलो चांदीचा दर 249000 रुपयांवरुन 246000 रुपयांवर आला आहे. सोने आणि चांदीचे हे दर जीएसटी शिवायचे आहेत.
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज एक तोळे सोन्याचा दर 153596 रुपयांर आला आहे. सोन्याच्या दरात 2004 रुपयांची घसरण झाली आहे. दुसरीकडे चांदीच्या दरात 6200 रुपयांची घसरण होऊन चांदीचा एक किलोचा दर 2.41 लाख रुपयांवर आला आहे. आज सकाळी साडे नऊ वाजता सोन्याचा वायद्याचा दर 154200 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर, चांदीच्या वायद्याचा दर 1.70 टक्क्यांनी घसरुण 2.44 लाख रुपयांवर आला आहे.
जागतिक बाजारात सोमवारी सोन्याच्या दरात देखील सलग दुसऱ्यांदा घसरण झाली आहे. अमेरिकेत व्याज दर दीर्घकाळ उच्च राहण्याची शक्यता असल्यानं गुंतवणूकदार सोन्यातील गुंतवणुकीपासून दूर जात आहेत.
स्पॉट गोल्डमध्ये 0.2 टक्के घसरण होऊन 4,321.49 डॉलर प्रति औंसवर आले आहेत. शुक्रवारी सोन्याच्या दरात तीन टक्के घसरण झाली आहे. 24 मार्चनंतर सोन्याचे दर निचांकी पातळीवर पोहोचले होते.
ऑगस्टच्या डिलिव्हरीच्या अमेरिकन गोल्ड फ्यूचर्समध्ये कमजोरी दिसून आली. या शेअरमध्ये 0.5 टक्क्यांनी घसरुन 4345.60 डॉलर प्रति औंसवर पोहोचले आहेत.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मे महिन्यात देशातील नागरिकांनी वर्षभरात सोने खरेदी करु नये असं आवाहन केलं होतं. यानंतर सराफा व्यावसायिकांकडून देशवासियांना जुनं सोनं जमा करुन नवं सोनं खरेदी करावं म्हटलं होतं. त्यामुळे ग्राहकांनी जुने सोने मोडण्यास सुरुवात केल्यानं बाजारातील सोने वाढले आहे. याशिवाय भारतानं सोने आयातीवरील शुल्क वाढवल्याचा देखील परिणाम सोन्याच्या आयातीवर झाला आहे.
जानेवारी 2025 सुरु सोने आणि चांदीच्या दरात मोठी तेजी पाहायला मिळाली होती. जानेवारी 2026 मध्ये सोने आणि चांदीच्या दरानं उच्चांक गाठला होता. त्यानंतर सोने आणि चांदीचे दर सातत्यानं घसरल्याचं पाहायला मिळतंय. जानेवारीत एमसीएक्सवर चांदीच्या दरानं 4 लाखांचा टप्पा ओलांडला होता.