Raigad Disabled Protest: रासळ ग्रामपंचायतीकडून दिव्यांगांचा ५% निधी रखडला; ९ जूनपासून सामूहिक उपोषणाचा इशारा
esakal June 08, 2026 09:45 PM

पाली : सुधागड तालुक्यातील रासळ ग्रामपंचायत हद्दीतील दिव्यांग बांधवांनी प्रशासनाविरोधात आक्रमक पाऊल उचलले आहे. सन २०२४-२०२५ या आर्थिक वर्षातील हक्काचा ५% दिव्यांग निधी अद्याप न मिळाल्यामुळे संतप्त झालेले दिव्यांग नागरिक मंगळवार (ता. 9) पासून ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सामूहिक उपोषणाला बसणार आहेत. यासंदर्भातील लेखी निवेदने त्यांनी स्थानिक प्रशासनापासून ते थेट कोकण आयुक्तांपर्यंत सर्वांना सादर केली आहेत.

रासळ ग्रामपंचायत हद्दीमध्ये तब्बल 23 दिव्यांग आहेत. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रासळ ग्रामपंचायत हद्दीत राहणाऱ्या दिव्यांग रहिवाशांनी ५% निधी मिळवण्यासाठी आवश्यक असलेली सर्व किराणा व इतर साहित्याची बिले मार्च २०२६ मध्येच ग्रामपंचायतीकडे जमा केली होती. मात्र, अडीच ते तीन महिने उलटून गेल्यानंतरही ग्रामपंचायत प्रशासनाने हा निधी दिव्यांगांना वर्ग केला नाही. प्रशासनाच्या या उदासीन आणि जाचक कारभारामुळे दिव्यांग बांधवांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.

आपल्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी दिव्यांग बांधवांच्या स्वाक्षऱ्या आणि अंगठ्यांचे ठसे असलेले निवेदन पंचायत समिती (पाली) गट विकास अधिकारी, तहसीलदार, पोलीस स्टेशन आदी विविध विभागांना देण्यात आले आहे. हे निवेदन देऊन प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. याशिवाय जिल्हाधिकारी साहेब (अलिबाग) आणि कोकण आयुक्त (कोकण भवन) यांनाही या निवेदनाच्या प्रती माहिती व योग्य त्या कारवाईसाठी पाठवण्यात आल्या आहेत.

आता ९ जूनच्या डेडलाईनपूर्वी रासळ ग्रामपंचायत आणि पंचायत समिती प्रशासन खडबडून जागे होऊन दिव्यांगांना न्याय देणार की दिव्यांग नागरिकांना या कडक उन्हात उपोषणाला बसावे लागणार, याकडे संपूर्ण सुधागड तालुक्याचे लक्ष लागले आहे.

निधी मिळेपर्यंत माघार नाही

आम्ही सर्व कागदपत्रे आणि बिले वेळेत देऊनही ग्रामपंचायत आम्हाला आमच्या हक्काच्या निधीपासून वंचित ठेवत आहे. दिव्यांगांची ही पिळवणूक सहन केली जाणार नाही. जर ९ जूनपर्यंत आमच्या खात्यात निधी जमा झाला नाही, तर आम्ही तीव्र उपोषण करू आणि याची सर्व जबाबदारी प्रशासनाची असेल, असा इशारा दिव्यांग प्रतिनिधीनी वैष्णवी देसाई व सर्व दिव्यांग प्रतिनिधींनी दिला आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.