Thane News: कल्याणमध्ये ऐतिहासिक शिल्पांचा शोध, हजारो वर्षांपूर्वीचा इतिहास उलगडला
esakal June 09, 2026 12:45 AM

टोकावडे : मुरबाड तालुक्यातील शेलारी परिसरात आढळलेल्या प्राचीन दगडी शिल्पांमुळे या भागाचा ऐतिहासिक वारसा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. निसर्ग पर्यटन केंद्र परिसरात माती आणि पानगळीत अंशतः दडलेली ही शिल्पे हजारो वर्षांपूर्वीच्या संस्कृतीची साक्ष देत असल्याचे इतिहास अभ्यासक योगेंद्र बांगर यांनी सांगितले. हे दगडी शिल्प प्राचीन स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना असल्याचे दिसून येते.

शिल्पावर वाघ, हत्ती, मोर, कमळ, तसेच उंटीणीसदृश आकृती कोरलेली आहे. काळाच्या ओघात झिजूनही त्यावरील कोरीव काम आजही स्पष्टपणे दिसून येते. यावरून त्या काळातील शिल्पकलेची समृद्ध परंपरा अधोरेखित होत असल्याचे अभ्यासकांचे मत आहे. शिल्पाच्या पायथ्यावरील तत्कालीन नक्षीकाम कलाशैली, व्यापारी संस्कृती आणि धार्मिक-सांस्कृतिक देवाणघेवाणीचे संकेत देणारे मानले जात आहे. यापूर्वी अडीच हजार वर्षांपूर्वीचेमानले जाणारे दगडी जातेही सापडले असून ते जतन करण्यात आले आहे. त्यामुळे या भागात प्राचीन मानवी वस्ती, शेतीसंस्कृती आणि जीवनपद्धती अस्तित्वात असल्याचे संकेत मिळत आहेत.

Mumbai Strike: टँकर चालकांचा संप, बेस्टचाही आंदोलनाचा इशारा, उष्णतेचा तडाखा... मुंबईकरांवर ट्रिपल संकट; चिंता वाढली

दरम्यान, या प्राचीन शिल्पांचे पुरातत्त्व विभागामार्फत सर्वेक्षण करून त्यांचे संवर्धन आणि जतन करण्यात यावे, अशी मागणी स्थानिक नागरिक व इतिहासप्रेमींनी केली आहे. अधिक संशोधन झाल्यास परिसरातील अन्य पुरातत्त्वीय अवशेष आणि ऐतिहासिक नोंदीही प्रकाशात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

व्यापारी मार्ग

योगेंद्र बांगर यांच्या मते, गोरखगडाकडे जाणारा जुना व्यापारी आणि रहदारी मार्ग या परिसरातून जात होता. सह्याद्रीतील व्यापारी, प्रवासी आणि साधुसंतांच्या वावरामुळे हा भाग ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा होता. शिल्पावरील उंटीणीच्या आकृतीचा संबंध राजस्थानातील व्यापारी संस्कृतीशी असू शकतो. एखाद्या राजस्थानी व्यापाऱ्याने या ठिकाणी दान दिले असावे किंवा व्यापारी हितसंबंधातून या शिल्पनिर्मितीला चालना मिळाली असावी.

Mumbai: मुंबईतील विहार तलावाला पौर्तुगीजकालीन इतिहास, पावणेचारशे वर्षांपूर्वीचे अवशेष अजूनही जिवंत
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.