नाशिकमध्ये गिरीश महाजन यांची यशस्वी शिष्टाई,भाजप बंडखोर प्रसाद हिरे यांचा नरेंद्र दराडे यांना पाठिंबा
Tv9 Marathi June 09, 2026 12:45 AM

महायुतीने स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत १७ पैकी ६ जागी बिनविरोध उमेदवारांना निवडून आणले, मात्र काही भागातील बंडखोरीने महायुतीचा फटका बसण्याची शक्यता होती. मात्र, आता जळगाव आणि नाशिक येथील विधानपरिषद निवडणूकीत आता मोठी घडामोड घडलेली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस उलटल्यानंतरही महायुतीत बंडखोरी संपवण्याचा भाजपा आणि शिवसेनेकडून सुरु होता. आता नाशिकमध्ये मोहिमेला यश आले असून भाजपाचे बंडखोर उमेदवार प्रसाद हिरे यांचे बंड शमवण्यास संकटमोचक गिरीश महाजन यांना यश आले आहे. प्रसाद हिरे यांनी आपली माघारी जाहीर केली आहे.

सोमवारी मोठी घडामोड घडली. उद्योग मंत्री उदय सामंत आणि मंत्री दादा भुसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली. आणि विशेष म्हणजे या दोघांसोबत भाजपचे बंडखोर उमेदवार प्रसाद हिरे देखील महाजन यांना भेटायला आले. या नेत्यांच्या एकत्र बैठकी चर्चा विनिमय झाल्यानंतर महायुतीच्या हितासाठी आपण या निवडणूकीतून माघार घेत असल्याने भाजपाचे बंडखोर उमेदवार प्रसाद हिरे यांनी जाहीर केले.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की आम्ही आमचे दोन्ही उमेदवार अर्ज मागे घेणार असल्याचे सुरुवातीपासून सांगत होतो. प्रसाद हिरे यांनी आता माघार घेतलेली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्याने आता त्यांना महायुतीचे उमदेवार नरेंद्र दराडे यांना आपला जाहीर पाठींबा दिलेला आहे.नाशिकचा प्रश्न मिठला असल्याने आता जळगावातील प्रश्नाचा विचार करतोय. गोकुळ गिते यांच्याशी चर्चा सुरु असून सायंकाळपर्यंत निर्णय होईल असा दावा त्यांनी यावेळी केला. तसेच विधान परिषद निवडणूकीत १७ पैकी सर्व १७ जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून येतील असे त्यांनी सांगितले.

नाशिकनंतर जळगाव पेच

नाशिकमध्ये बंडखोरी शमवण्यास यश आले असले तरी जळगावात अजूनही पेच कायम आहे. जळगावात संख्याबळाच्या आधारे विजय सोपा असल्याने निर्धास्त असलेल्या भाजपाला येथेही बंडखोरीचा फटका बसला आहे. भाजपने नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी दिली, मात्र, शिंदे गटातील संबंधित रेश्मा काळे यांनी अपक्ष म्हणून बंडखोरी केली आहे.काळे यांची समजूत काढण्यासाठी महायुतीने अनेक प्रयत्न केले असेल तरी त्यांना दाद मिळालेली नाही. मात्र, आता नाशिक येथे प्रसाद हिरे यांनी माघार घेतल्याने जळगावही हा पेच सुटले असा दावा महायुतीने केला आहे. नाशिक येथील दुसरे अपक्ष उमेदवार गोकुळ गिते पेठ तालुक्यात मतदारांच्या भेटी घेत आहेत. त्यांच्यासोबतही बोलणी सुरु असल्याचे महाजन यांनी म्हटले आहे. सायंकाळपर्यंत चांगली बातमी येईल असे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.