Pune Rave Party : मुंबई-पुणे रेव्ह पार्टी प्रकरणात एसआयटी चौकशीची मागणी; मुख्य सूत्रधारांवर एमपीडीए कारवाईचा डॉ. नीलम गोऱ्हे यांचा आग्रह
esakal June 09, 2026 03:45 AM

पुणे : मुंबई आणि पुण्यातील तुळापूर (ता. हवेली) येथील रेव्ह पार्टी प्रकरणाची विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी करण्यात यावी. तसेच, मुख्य सूत्रधारांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेच्या नेत्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राज्याचे पोलिस महासंचालक यांच्याकडे केली आहे.

पुणे, मुंबई आणि परिसरात वाढत चाललेल्या रेव्ह पार्ट्या, अमली पदार्थांची विक्री आणि अशा पार्ट्यांमधील मृत्यूंबाबत डॉ. गोऱ्हे यांनी चिंता व्यक्त केली आहे. पुणे पोलिसांनी तुळापूर येथील फार्म हाउसवर टाकलेल्या छाप्यात मोठ्या प्रमाणावर मद्य साठा, गांजा आणि हुक्का फ्लेवर्स जप्त करण्यात आले. सोशल मीडियाच्या माध्यमातून गोपनीय पद्धतीने अशा पार्ट्यांचे आयोजन आता शहरांमधून ग्रामीण भागातील फार्म हाउस, रिसॉर्ट॒स आणि खासगी व्हिलांमध्ये केले जात आहे. त्यामुळे पुणे, मुंबई, लोणावळा, ठाणे, मुळशी, कर्जत आणि वाघोली परिसरात विशेष तपास मोहीम राबविण्याची गरज आहे.

अशा प्रकरणांमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांचा आधार घेत पोलिसांनी गुन्हा दाखल करून मुख्य सूत्रधार, ड्रग्ज तस्कर आणि आयोजकांवर कठोर कारवाई करावी. भक्कम दोषारोपपत्र दाखल करून दोषसिध्दीचे प्रमाण वाढवावे, मुंबईतील पार्टी मृत्यू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करावी, मुख्य आरोपीवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करावी, युवा पिढीला अमली पदार्थाच्या विळख्यातून वाचविण्यासाठी राज्य पातळीवर विशेष मोहीम राबवावी, अशा मागण्या डॉ. गोऱ्हे यांनी पोलिस महासंचालकांना पाठविलेल्या पत्राद्वारे केल्या आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.