वाघोली - पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने वाघोली येथील लोहगाव रस्त्यावरील सुमारे ३० हजार चौरस फूट क्षेत्रावरील अनधिकृत बांधकामांवर सोमवारी कारवाई केली. यात सात मजली इमारतीसह १० ते १२ बहुमजली इमारतींच्या बांधकामांचा समावेश आहे.
लोहगाव रस्त्यावरील सुयोग निसर्ग सोसायटीच्या परिसरात सकाळी सहा वाजल्यापासून या मोहिमेला प्रारंभ झाला. महापालिकेने काही दिवसांपूर्वी केलेल्या पाहणीत अनेक इमारतींचे बांधकाम बेकायदा पद्धतीने सुरू असल्याचे निदर्शनास आले होते. संबंधित इमारतधारकांना दोन दिवसांपूर्वी नोटीस बजावण्यात आली होती.
सोमवारी पोलिस बंदोबस्तात जेसीबी आणि ट्रॅक्टरच्या साह्याने ही बांधकामे पाडण्यात आली. यामध्ये ७५ सदनिका प्रस्तावित असलेल्या एका सात मजली इमारतीचे पूर्ण बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले. या इमारतीचे ११ मजले बांधण्याचे नियोजन असल्याचे तपासात समोर आले होते.या कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार किंवा विरोध झाला नाही.
महापालिकेच्या पाहणीत अनेक बेकायदा इमारतींची बांधकामे सुरू असल्याचे दिसून आले. महापालिका आयुक्तांनी आदेश दिल्यानंतर आज ही कारवाई करण्यात आली. यामध्ये ७५ सदनिका असलेल्या एका इमारतीचे पूर्ण बांधकाम पाडण्यात आले असून, यापुढेही सातत्याने कारवाई सुरू राहणार आहे.
- सोमनाथ बनकर, उपायुक्त, अतिक्रमण विभाग, पुणे महापालिका