कन्नड : तालुक्यातील चिखलठाण शिवारात गांधेरी नदी पात्रातून विनापरवाना व बेकायदेशीरपणे वाळूचा उपसा करून चोरटी वाहतूक करणाऱ्या टोळीवर कन्नड ग्रामीण पोलिसांनी सोमवारी (ता. ८) मध्यरात्रीच्या सुमारास धडक कारवाई केली. या छाप्यात पोलिसांनी तीन ट्रॅक्टर, एक जेसीबी आणि दोन मोबाईल फोनसह तब्बल ६८ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवार (ता.८) रोजी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास चिखलठाण शिवारातील चेतन चव्हाण यांच्या शेतालगत, ग्रामपंचायतीच्या सरकारी विहिरीच्या बाजूला असलेल्या गांधेरी नदी पात्रात काही जण अवैध वाळू उपसा करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी पथकासह घटनास्थळी छापा टाकला. नदी पात्रात आरोपी हे जेसीबीच्या साहाय्याने आणि मोबाईलच्या उजेडात ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये वाळू भरत असताना पोलिसांना रंगेहात आढळून आले.
पोलिसांची गाडी पाहताच दोन ट्रॅक्टर चालकांनी ट्रॉलीमधील वाळू पुन्हा नदी पात्रात खाली करून पळून जाण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी त्यांना शिताफीने ताब्यात घेतले. शासनाचा कोणताही महसूल (रॉयल्टी) न भरता, स्वतःच्या फायद्यासाठी ही वाळू चोरून नेली जात होती. तसेच चालकांकडे वाहनांचे कोणतेही वैध कागदपत्रे आणि परवाना नव्हता. पोलिसांनी या प्रकरणी अरबाज गुलाब शेख (वय २४) अनिल वसंतराव चव्हाण (वय ३४) मनोज वसंत चव्हाण (जेसीबी चालक, वय ३२) दीपक सांडू नागीले (वय ४२) विवेक नारायण दळे (वय २१ सर्व रा.चिकलठाण, ता.कन्नड) यांच्या विरुध्द कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार कैलास करवंदे करत आहेत.