पुणे - लातूरहून पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयात प्रवेश घेतलेला सोहम गेल्या तीन दिवसांपासून खोली शोधतो आहे. ‘सदाशिव पेठेत एका दहा बाय दहाच्या खोलीत आधीच तीन मुले राहत आहेत, घरमालक मला तिथे चौथा म्हणून राहायला सांगत होते आणि तरीही महिन्याचे भाडे पाच हजार रुपये! शिवाय दोन महिन्यांचे डिपॉझिट वेगळे,’ ...सोहम हताशपणे सांगत होता.
सोहमची ही धडपड प्रातिनिधिक आहे. कारण नवीन शैक्षणिक वर्षाच्या निमित्ताने पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या हजारो विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या पालकांची सध्या हीच अवस्था आहे. शहरातील काही मोजक्याच महाविद्यालयांना स्वतःची वसतिगृहे आहेत. वाढत्या विद्यार्थी संख्येपुढे ही वसतिगृहे अपुरी पडत असल्याने खासगी वसतिगृहे आणि पेइंग गेस्ट अशी निवासस्थाने शोधण्याशिवाय विद्यार्थ्यांपुढे पर्याय उरत नाही. मात्र विद्यार्थ्यांची वाढती गर्दी आणि वसतिगृहांची कमतरता यामुळे या जागांच्या भाड्याचे दर गगनाला भिडले आहेत.
गेल्या आठवड्यापासून मी मैत्रिणींसोबत खासगी वसतिगृह शोधत आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने चांगल्या असलेल्या जागांचे दर आवाक्याबाहेर आहेत आणि कमी भाडे असलेल्या वसतिगृहांमध्ये स्वच्छता, सुविधांचा अभाव अशा समस्या आहेत.
- स्नेहा कदम, विद्यार्थिनी
सुरक्षित वसतिगृह शोधण्याचे आव्हान
शहरात मध्यवर्ती भागात बहुतांश महाविद्यालये आहेत. त्यामुळे महाविद्यालयांपासून जवळ राहण्याची सोय व्हावी, यासाठी प्रभात रस्ता, कोथरूड, सदाशिव-नारायण पेठ, नवी पेठ, सहकारनगर, सिंहगड रस्ता, धनकवडी, सेनापती बापट रस्ता या परिसरात विद्यार्थ्यांची सर्वाधिक शोधाशोध सुरू आहे. विद्यार्थिनींसाठी तर सुरक्षित आणि चांगल्या सुविधा असलेले वसतिगृह शोधणे, हे एक मोठे आव्हान बनले आहे.
विद्यार्थी कोंबण्याचे प्रकार
भाड्याव्यतिरिक्त अनामत रक्कम आणि वीजबिलाचा अतिरिक्त भुर्दंडही पालकांना सहन करावा लागतो आहे.
अधिक नफ्यासाठी एकाच खोलीत तीन-चार विद्यार्थ्यांना कोंबण्याचा हट्टही घरमालक करतात.
तुमचे मत मांडा
शहरात बाहेरून आलेल्या विद्यार्थ्यांना वसतिगृह मिळवताना मोठ्या कसरती कराव्या लागत आहेत. मात्र जागांच्या भाड्याचे दर गगनाला भिडले आहेत. याबाबत तुमचे मत नावासह क्यूआर कोड स्कॅन करून किंवा editor.pune@esakal.com या मेलवर, तसेच ८४८४९७३६०२ या व्हॉट्सॲप क्रमांकावर कळवा.