वितळलेले लोखंड अंगावर पडल्याने आंध्रमध्ये 8 कामगारांचा मृत्यू झाला.
Marathi June 09, 2026 11:25 AM

विशाखापट्टणम स्टील प्रकल्पात क्रेनचा तोल गेल्याने दुर्घटना

वृत्तसंस्था/ विशाखापट्टणम

आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथील स्टील प्रकल्पामध्ये सोमवारी  एक मोठा अपघात झाला. सुमारे 1600 अंस सेल्सिअस तापमानाचे वितळलेले लोखंड कामगारांवर पडल्याने अपघातात 8 कामगारांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताच्या कारणाचा तपास सध्या सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. हा अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाला की सुरक्षा मानकांमध्ये हलगर्जीपणामुळे हे निश्चित केले जात आहे.

क्रेनच्या साहाय्याने वितळलेल्या लोखंडाचे एक मोठे भांडे वाहून नेले जात असताना क्रेनचा तोल गेल्याने त्यातील गरम लोखंड खाली असलेल्या कामगारांवर पडले. हा अपघात राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेडच्या (आरआयएनएल) स्टील प्रकल्पामध्ये घडला. अपघातामुळे प्रकल्पाच्या परिसरात घबराट पसरली. बचाव आणि मदत पथके तात्काळ घटनास्थळी दाखल झाली असून जखमींना बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी या अपघातावर दु:ख व्यक्त करत जखमींना सर्वोत्तम उपचार देण्याचे आणि बचावकार्याला गती देण्याचे निर्देश दिले. तसेच गृहमंत्री वंगलपुडी अनिता यांनी अपघाताची चौकशी करण्यासाठी विशाखापट्टणमचे जिल्हाधिकारी आणि शहर पोलीस आयुक्त यांच्याशी फोनवर संवाद साधला.

स्टील प्रकल्पाचे सर्कल इन्स्पेक्टर केशव राव यांच्या म्हणण्यानुसार, उच्च तापमानात वितळलेले लोखंड वाहून नेणारी एक पळी फुटल्याने ही घटना घडली. स्टील प्लांटमध्ये घबराट पसरली आणि कामगार जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळू लागले. मदत व बचाव पथक घटनास्थळी पोहोचले असून आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्याच्या गृहमंत्री वंगलपुडी अनिता यांनी घटनेची माहिती मिळताच तात्काळ अपघातस्थळी रवाना झाल्या. त्या संबंधित अधिकाऱ्यांशी फोनवर सतत संपर्कात आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.