Donald Trump Warns Netanyahu: इराण आणि इस्रायल (Iran Israel War Update) यांच्यातील संघर्ष पुन्हा दिवसागणिक वाढत असल्याने, अमेरिका-तेहरान शांतता करार धोक्यात आल्याची शक्यता वाढली आहे. दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी केलेलं एक वक्तव्य सध्या चर्चेत आलं असून युद्धाच्या पार्श्वभूमीवर 'इस्रायलयने (Israel) काय करतोय याचं भान ठेवावं, अन्यथा इराणविरुद्धच्या युद्धात एकटे पडाल' असा निर्वाणीचा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू (Benjamin Netanyahu) यांना दिलाय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी सांगितले की, त्यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना इशारा दिला होता की, जर इस्रायलने इराणविरुद्धचे युद्ध पुन्हा सुरू केले, तर त्यांना एकट्याने लढावे लागू शकते.
Donald Trump : हल्ल्यांबाबत इस्रायलने आम्हाला खूप उशिरा कल्पना दिली, अखेरीस मी...
अमेरिकेतील 'ॲक्सिओस' (Axios) या ऑनलाइन प्रसारमाध्यमाशी दूरध्वनीवरून बोलताना ट्रम्प यांनी दावा केला की, रविवारी झालेल्या हल्ल्यांबाबत इस्रायलने आम्हाला "खूप उशिरा" कल्पना दिली होती. 'ते (हल्ला करण्यासाठी) आधीच निघाले होते. पण अखेरीस मी (इस्रायलचा हल्ला) मर्यादित ठेवण्यास भाग पाडले,' असे ट्रम्प म्हणाले. एका अमेरिकन अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, ट्रम्प यांनी रविवारी संध्याकाळी नेतान्याहू यांना फोन केला आणि त्यांना प्रतिहल्ला न करण्याची विनंती केली. या संभाषणादरम्यान ट्रम्प यांनी असा युक्तिवाद केला की, एकतर काही दिवसांत इराणसोबत असा करार होईल, ज्यामुळे हल्ल्यांची गरज उरणार नाही, किंवा तसा करार होणार नाही. अशा परिस्थितीत इराणवरील हल्ल्यांचे नेतृत्व कदाचित ते स्वतः करतील. या संभाषणाची माहिती असलेल्या एका इस्रायली सूत्राने ही माहिती दिली.
त्यानंतर सोमवारी, नेतान्याहू यांनी व्हाईट हाऊसला कळवले की इस्रायल 'जेव्हा आवश्यक असेल तेव्हा' हल्ला करणे सुरूच ठेवेल. रविवारी रात्रीपासून एकमेकांवर झालेल्या हल्ल्यांच्या मालिकेनंतर जी एप्रिलमधील युद्धविरामानंतरची सर्वात गंभीर तणावाची स्थिती होती. सोमवारी इराण आणि इस्रायलने एकमेकांवरील हल्ले थांबवण्याचे संकेत दिले.
Benjamin Netanyahu: इस्रायलकडून इराणवरील हल्ले थांबवण्याची घोषणा
नेतान्याहू यांनी सोमवारी सांगितले की, इराणविरुद्धचा मारा सध्या 'थांबवण्यात' आला आहे, परंतु त्यांनी इशारा दिला की जर इराणने पुन्हा हल्ले सुरू केले तर इस्रायल जोरदार प्रत्युत्तर देईल. 'सध्या, मारा थांबवण्यात आला आहे, कारण आम्ही हल्ला केल्यानंतर त्यांनी (इराणने) आमच्यावर हल्ले करणे थांबवले,' असे नेतान्याहू यांनी रविवारी रात्री इराणने इस्रायलवर क्षेपणास्त्रे डागल्यानंतर 20 तासांहून अधिक काळानंतर दिलेल्या पहिल्या दूरचित्रवाणीवरील निवेदनात सांगितले. 'जर इराणने पुन्हा आमच्यावर हल्ला करण्याची चूक केली, तर आम्ही बळाचा वापर करून प्रत्युत्तर देऊ,' असेही ते म्हणाले.
यापूर्वी, इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी सांगितले होते की, इस्रायल हिजबुल्लाविरुद्ध हल्ले सुरूच ठेवेल आणि उत्तर इस्रायलमधील वस्त्यांवर होणाऱ्या कोणत्याही हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून लेबनॉनची राजधानी बेरूतच्या दक्षिणेकडील 'दाहिये' (Dahieh) भागात हल्ला करेल. नेतान्याहू यांच्या निवेदनानंतर, इस्रायलच्या 'होम फ्रंट कमांड'ने जाहीर केले की मंगळवारी सकाळी देशभरातील नागरी संरक्षणाशी संबंधित बहुतेक निर्बंध उठवले जातील, मात्र लेबनॉनच्या सीमेजवळील उत्तरेकडील काही वस्त्यांमध्ये निर्बंध कायम राहतील. त्यानंतर सोमवारी, इस्रायली मंत्रालयांनी निवेदनाद्वारे जाहीर केले की इस्रायलमधील रुग्णालये पूर्ण क्षमतेने आणि सामान्यपणे कार्यरत झाली आहेत, तर इस्रायल आणि इराणने एकमेकांवरील हल्ले थांबवल्यामुळे मंगळवारी शाळा पुन्हा सुरू होण्याची अपेक्षा आहे.