चोख प्रत्युत्तर देऊ, इराणने अमेरिकेचे हेलिकॉप्टर पाडल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प संतापले
Marathi June 10, 2026 04:24 AM

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणबाबत एक मोठा दावा केला असून, इराणने अमेरिकन सैन्याचे एक अपॅचे हेलिकॉप्टर पाडल्याचे त्यांनी म्हटले आहे. या हल्ल्याला अमेरिकेकडून चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा संतापलेल्या ट्रम्प यांनी दिला आहे. हेलिकॉप्टर पाडले गेले असले तरी त्यातील दोन्ही पायलट पूर्णपणे सुरक्षित असून त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही आणि या दोन्ही क्रू सदस्यांना सुरक्षितपणे वाचवण्यात आले आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. टीव्ही९ भारतवर्षने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

मंगळवारी आपल्या ‘ट्रुथ सोशल’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका पोस्टद्वारे ट्रम्प यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले आहेत की, “गेल्या रात्री होर्मुझच्या सामुद्रधुनीत गस्त घालत असताना इराणने अमेरिकेचे हे अपॅचे हेलिकॉप्टर पाडले.” तत्पूर्वी सोमवारी होर्मुझजवळ अमेरिकन सैन्याचे अपॅचे गनशिप हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यानंतर दोन्ही क्रू सदस्य सुरक्षित असल्याची पुष्टी करत, मंगळवारी ट्रम्प यांनी इराणनेच हे हेलिकॉप्टर पाडल्याचा दावा केला. यामुळे आता दोन्ही देशांमधील तणाव पुन्हा एकदा वाढला असून, ट्रम्प इराणवर लवकरच मोठा हल्ला करू शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे.

विशेष म्हणजे या घटनेच्या अवघ्या एक दिवस आधीच ट्रम्प यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी संवाद साधला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रविवारी इराणने इस्रायलवर डागलेल्या क्षेपणास्त्रांना इस्रायलने प्रत्युत्तर देऊ नये, असे आवाहन ट्रम्प यांनी केले होते. तसे केल्यास गेल्या तीन महिन्यांपासून संघर्ष संपवण्यासाठी सुरू असलेली शांतता वार्ता धोक्यात येऊ शकते, असा इशारा देत त्यांनी इस्रायलला संयम बाळगण्यास सांगितले होते. तसेच इराणलाही चर्चेच्या टेबलावर परतण्याचे आवाहन ट्रम्प यांनी केले होते.

सध्यातरी या संपूर्ण प्रकरणावर अमेरिका किंवा इराणकडून कोणतीही सविस्तर अधिकृत माहिती जारी करण्यात आलेली नाही. तसेच ट्रम्प यांच्या दाव्यावर इराणची अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नसून, ट्रम्प यांच्या या विधानामुळे क्षेत्रात तणाव वाढण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.