Maharashtra Rain Updates: भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रातील तब्बल 30 जिल्ह्यांसाठी आज (10 जून) यलो अलर्ट जारी (Rain Yellow Alert) केला आहे. पुढील काही दिवस राज्यातील अनेक भागांत वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवली आहे. मुंबई, पुणे, ठाणे आणि कोकणासह राज्याच्या विविध भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. (Maharashtra Rain Updates)
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, बीड, परभणी, लातूर, धाराशिव, नांदेड, हिंगोली, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा त्यामध्ये समावेश आहे. या भागांमध्ये काही ठिकाणी ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता असून विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. (Maharashtra Rain Updates)
मुंबई आणि ठाणे परिसरात आज तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. काल मुंबईसह उपनगरातील अनेक भागांत हलक्या सरींचा शिडकावा झाला. तसेच दिवसभर ढगाळ वातावरण होते.
मान्सूनच्या सुरवातीलाच पहिल्या पावसाच्या आगमनाने आंबोलीतील निसर्गाचे रुप पालटलं आहे. दाट धुकं, ऊन पावसाचा खेळ, अल्दादायक वातावरण यामुळे आंबोलीचे रूप अधिकच खुलल आहे. तर पहिल्याच पावसात आंबोलीचा मुख्य धबधबा काही अंशी प्रवाहित झाला आहे. काळ्याशार कड्यावरून पाण्याचे पांढरे शुभ्र प्रवाह आता हळूहळू खाली कोसळू लागले आहेत. निसर्गाचे हे सुंदर रूप पाहण्यासाठी आणि पहिल्या पावसाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची पावले आंबोलीकडे वळू लागली आहेत. आंबोलीच्या मुख्य धबधब्यावरून पाण्याचे लहान प्रवाह वाहू लागल्याने आणि आजूबाजूला पसरलेली हिरवळ मनाला सुखावणारी आहे. त्यामुळे पर्यटकांची रेलचेल आंबोली घाटात पाहायला मिळत आहे. सध्या महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक येथून पर्यटक आंबोली घाटात हजेरी लावत आहेत. कड्यावरून कोसळणाऱ्या थंडगार पाण्यात भिजण्याचा आणि धुक्याची चादर अनुभवण्याचा आनंद पर्यटक घेत आहेत.
बीड तालुक्यात सायंकाळनंतर वादळी वाऱ्यासह दमदार पावसाने हजेरी लावली. या पावसाने छोटे नदी नाले प्रवाहित झाले आहे. चौसाळा, रौळसगाव, अंजनवती, लिंबागणेश आणि मांजरसुंबा परिसरात हा दमदार पाऊस झाला. आणि याच पावसाने समाधानकारक चित्र पाहायला मिळालं. तर वादळी वाऱ्याने अनेक घरावरील पत्रे उडून गेल्याने अंजनवती गावातील एक कुटुंब उघड्यावर आलंय. जूनच्या पहिल्याच आठवड्यात दमदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होतंय. परंतु 100 मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरण्या करू नयेत असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
गडचिरोलीच्या सिरोंचा शहरासह तालुक्यातील 50 हुन अधिक गावातील नागरिकांना तब्बल 29 तास अंधाराचा सामना करावा लागल्यानंतर अखेर वीजपुरवठा पूर्ववत झाला आहे. मात्र या प्रकाराने सिरोंचा तालुक्यातील वीज व्यवस्थेतील गंभीर त्रुटी पुन्हा एकदा समोर आल्या आहेत. आलापल्ली ते सिरोंचा दरम्यानच्या 66 केव्ही वीजवाहिनीवर वादळी वारा, मुसळधार पाऊस आणि तांत्रिक अडचणींमुळे मोठा बिघाड निर्माण झाला होता. घनदाट जंगलात जीव धोक्यात घालून महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी रात्रंदिवस मेहनत घेत अखेर वीजपुरवठा सुरळीत केला. पण प्रत्येक वेळी नागरिकांना तासन्तास अंधारात राहावं लागणार का, असा सवाल आता उपस्थित होत आहे. त्यामुळे सिरोंचासाठी स्वतंत्र मेंटेनन्स पथक आणि रखडलेल्या 132 केव्ही वीज प्रकल्पाला गती देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. घनदाट जंगलातून जाणारी जवळपास 90 किलोमीटर लांबीची 66 केव्ही वीजवाहिनी यामुळे सिरोंचा तालुक्यात वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याची समस्या निर्माण होत आहे. मात्र भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी जिमलगट्टा परिसरात स्वतंत्र तांत्रिक पथक तैनात करावे आणि तेलंगणातून प्रस्तावित 132 केव्ही वीजपुरवठा प्रकल्पाचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.