मुंबईतील बीकेसीमध्ये दर शुक्रवारी नो कार, देशातील पहिला कार फ्री फ्रायडे उपक्रम नेमका काय?
मुकेश चव्हाण June 10, 2026 02:13 PM

12 जूनपासून प्रत्येक शुक्रवार ‘पब्लिक ट्रान्सपोर्ट डे’ म्हणून पाळला जाणार असून जवळपास दोन लाख कर्मचाऱ्यांना ट्रेन, मेट्रो आणि बसचा वापर करण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. बीकेसीमध्ये काम करणाऱ्या सुमारे 2 लाख व्यावसायिकांना शुक्रवारी स्वतःची कार चालवण्याऐवजी किंवा कॅब बुक करण्याऐवजी ट्रेन, मेट्रो किंवा बसचा वापर करण्याचे जोरदार आवाहन केले जात आहे. या उपक्रमावर किमान 3 ते 4 महिने बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे. दर आठवड्याला येणाऱ्या अडचणींचा आढावा घेऊन आवश्यक ते बदल केले जाणार आहेत. (BKC Car Free Friday)

प्रवास अजूनही खासगी कार, टॅक्सी किंवा रिक्षांवर अवलंबून- (BKC Car Free Friday)

MMRDA च्या माहितीनुसार, बीकेसीमध्ये येणाऱ्या 52 टक्के लोकांचा प्रवास अजूनही खासगी कार, टॅक्सी किंवा रिक्षांवर अवलंबून आहे. तर केवळ 25 टक्के लोक सार्वजनिक वाहतुकीचा वापर करतात. याशिवाय बीकेसीतील निम्म्याहून अधिक कर्मचाऱ्यांचा रोजचा प्रवास करताना दोन तासांपेक्षा जास्त वेळ जातो.

बीकेसी हे सर्वात महत्त्वाचं व्यावसायिक हब- (BKC Car Free Friday)

मुंबईसह देशात बीकेसी हे सर्वात महत्त्वाचं व्यावसायिक हब आहे. या बिझनेस हबमध्ये अनेक मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत. या मोठ्या कंपन्यासोबत महत्त्वाचे सरकारी कार्यालयदेखील आहेत. त्यामुळे या परिसरात दररोज दोन लाखांपेक्षा कर्मचारी कामासाठी येत असतात. या कर्मचाऱ्यांसह मोठ्या प्रमाणात अनौपचारिक रोजगार करणारेही येत असतात. त्यामुळे या निर्णयाचं कितपत अंमलबजावणी होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, बीकेसी आणि त्याच्या आसपास सार्वजनिक वाहतुकीचे सक्षम जाळे आधीपासूनच अस्तित्वात आहे, तरीही अनेक प्रवाशांना याची कल्पना नाही. ‘अक्वा लाइन’ (मेट्रो लाइन ३) BKC ला थेट जोडते, तर वांद्रे आणि कुर्ला रेल्वे स्थानके ‘फीडर सेवां’द्वारे (स्थानकापासून मुख्य ठिकाणापर्यंत नेणाऱ्या सेवा) जोडलेली आहेत. ‘बेस्ट’ (BEST) या मार्गावर दररोज १०० हून अधिक बसेस चालवते, ज्यातून २५,००० ते ३०,००० प्रवासी प्रवास करतात. असे असूनही, ‘लास्ट-माईल’ कनेक्टिव्हिटी – म्हणजेच रेल्वे स्थानकापासून कार्यालयापर्यंतचा प्रवासाचा शेवटचा एक किंवा दोन किलोमीटरचा टप्पा – हे सर्वात मोठे आव्हान ठरत आहे. 

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.