भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुबमन गिल याने अफगाणिस्तान विरूद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात शतकं लगावलं. शुबमनला या शतकी खेळीचा जबरदस्त फायदा झाला आहे. शुबमनने आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये टॉप 10 मधील आपलं स्थान आणखी भक्कम केलं आहे. शुबमनने अफगाणिस्तान विरुद्ध घरच्या मैदानात न्यू चंडीगडमध्ये केलेल्या शतकी खेळीमुळे भारताला पहिल्या डावात 550 पार मजल मारता आली होती. तसेच भारताने हा सामना अडीच दिवसांतच डाव आणि 300 धावांनी जिंकला होता. त्यानंतर आयसीसीने कसोटी क्रमवारी जाहीर केलीय. यात शुबमनला किती फायदा झालाय? हे सविस्तर जाणून घेऊयात.
शुबमनने अफगाणिस्तान विरुद्ध 177 बॉलमध्ये 126 रन्स केल्या होत्या. शुबमनने या खेळीच्या जोरावर टेस्ट बॅटिंग रँकिंगमध्ये 2 स्थानांची झेप घेतली आहे. आयसीसीच्या ताज्या कसोटी क्रमवारीनुसार शुबमन गिल आठव्या स्थानी पोहचला आहे. तर दुसऱ्या बाजूला यशस्वी जैस्वाल याला मात्र फटका बसला आहे.
ताज्या आकडेवारीनुसार, शुबमनच्या खात्यात 743 रेटिंग पॉइंट्स आहेत. शुबमनने 2 स्थानाची झेप घेतल्याने यशस्वीला फटका बसला आहे. यशस्वीची आठव्या स्थानावरुन नवव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. मात्र शुबमन आणि यशस्वी या दोघांव्यतिरिक्त टेस्ट रँकिंगमध्ये पहिल्या 10 फलंदाजांत एकही भारतीय नाही.
शुबमनने अफगाणिस्तान विरुद्ध शतक केल्याने त्याला टेस्ट रँकिंगमध्ये फायदा होणं अपेक्षित होतं. तर यशस्वीला मोठी खेळी करण्याची संधी होती. मात्र यशस्वी चांगल्या सुरुवातीनंतरही मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. तसेच केएल राहुल यानेही अफगाणिस्तान विरुद्ध शतक केलं होतं. मात्र केएल त्यानंतरही आहे त्याच स्थानी कायम आहे. केएलने 165 बॉलमध्ये 100 रन्स केल्या होत्या. केएल ताज्या क्रमवारीत 34 व्या स्थानी आहे.
तसेच टीम इंडियाचा विकेटकीपर बॅट्समन ऋषभ पंत याला कसोटी क्रमवारीत एका स्थानाचा फायदा झाला आहे. पंत 12 व्या स्थानी पोहचला आहे. पंतने अफगाणिस्तान विरुद्ध 81 धावांची खेळी केली होती.
टेस्ट रँकिंगमध्ये नंबर 1 कोण?
न्यूझीलंडला इंग्लंड विरुद्ध लॉर्ड्स कसोटीत पराभूत व्हावं लागलं. या पराभवानंतर ऑलराउंडर रचीन रवींद्र याला फटका बसला आहे. रचीनची 10 व्या स्थानावरुन 13 व्या क्रमांकावर घसरण झाली आहे.